Khed accident | ढोरे भांबुरवाडीत दुर्दैवी अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू
शेतात कामासाठी जात असताना घडली दुर्घटना; शंकर विठ्ठल भांबुरे (३८) यांचा मृत्यू, खेड पोलिसांत नोंद
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील ढोरे भांबुरवाडी येथे शेतातील कामासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना ट्रॅक्टर अचानक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात चालक शंकर विठ्ठल भांबुरे (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवार (दि. ३ जून ) रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
शेतात काम करत असताना ऐकू आला ओरडण्याचा आवाज
याबाबत सागर रोहीदास ढोरे (वय ३१, व्यवसाय – शेती, रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सागर ढोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सकाळी शेतात काम करत असताना त्यांचे मामा विठ्ठल सबाजी भांबुरे यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने धावत गेल्यानंतर विठ्ठल भांबुरे यांनी त्यांना त्यांचा मुलगा शंकर भांबुरे ट्रॅक्टरसह शेतात येत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याचे सांगितले.
ट्रॅक्टरखाली अडकला चालक
घटनास्थळी शोध घेतला असता शंकर भांबुरे दिसून आले नाहीत. त्यानंतर ट्रॅक्टरखाली पाहणी केली असता त्यांचा पाय दिसून आला. ग्रामस्थांच्या मदतीने दुसऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रॅक्टर बाजूला करण्यात आला. त्यावेळी शंकर भांबुरे हे ट्रॅक्टरखाली अडकलेल्या अवस्थेत आढळून आले.
डॉक्टरांनी मृत घोषित केले
ग्रामस्थांनी तातडीने शंकर भांबुरे यांना कारमधून राजगुरूनगर येथील साळुंके मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अपघाताची नोंद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर विठ्ठल भांबुरे हे त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १४ जीएच ७४५९) भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे शेतात चालवत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
गावात हळहळ व्यक्त
शंकर भांबुरे यांच्या आकस्मिक निधनामुळे ढोरे भांबुरवाडी परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मेहनती व शांत स्वभावाचे शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ओळख होती.
