अंत्यविधीचे सेवाकार्य व वारकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न ; कमलाई प्रतिष्ठानकडून पहिलाच स्तुत्य उपक्रम

खेड तालुक्यातील ५० गावचे ७०० सेवाकार्य करणाऱ्या अंत्यविधी संस्कार लोकांसह वारकरी मंडळींचा सन्मान

अंत्यविधीचे सेवाकार्य व वारकऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न ; कमलाई प्रतिष्ठानकडून पहिलाच स्तुत्य उपक्रम

Sharad Buttepatil | Kamlai Pratishthan 

महावार्ता लाईव्ह | गावात निधनाची बातमी समजताच जात,धर्म,पंथ न पाहता आणि कोणाच्या निमंत्रनाची वाट देखील न पाहता स्वतः पुढे होऊन मृत व्यक्तीच्या जीवनातील शेवटचा स्मशानभूमीत होणारा अंत्यविधी संस्कार साजरा करणारे खेड तालुक्यातील ५० गावचे जवळपास ७०० सेवाकार्य करणाऱ्या अंत्यविधी संस्कार लोकांसह वारकरी मंडळींचा सत्कार श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष व गुरुवर्य हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे हस्ते करण्यात आला.

 

जगतगुरू संत तुकाराम महाराजांची साक्षात्कारभूमी असलेल्या श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगराचे पायथ्याच्या परिसरातील सभागृहात अंत्यविधी संस्कार सेवाकार्य करणारे मंडळी व वारकऱ्यांचा सन्मान कमलाई प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार (दि.३०) रोजी संपन्न झाला.प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, हभप चैतन्य महाराज लोंढे, बाळशीराम महाराज मिंडे, हभप मंगेश महाराज शिंदे, हभप धनंजय महाराज रौधळ, हभप गोरख महाराज जाधव, हभप संजय महाराज घुंडरे, माजी उपसभापती चांगदेव शिवेकर, सखाराम खेंगले, अमृत शेवकरी, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष दिलीप वाळके, प्रतिष्ठानचे सर्व संचालक व वारकरी उपस्थित होते.

 

दशक्रियाविधी कार्यक्रमात प्रवचनासाठी महाराजांना बसण्यासाठी गालिचा, ज्ञानेश्वरी गाथा, लाकडी व्यासपीठ हे साहित्य गावांसाठी देण्यात आले. तर अंत्यविधी संस्कार करणारे मंडळी आणि वारकऱ्यांचा सत्कार हभप औसेकर महाराज यांचे हस्ते सन्मानचिन्ह, टोपी, वारकरी उपरणे देऊन करण्यात आला.अंत्यविधी करणाऱ्यांचा सत्कार हा कार्यक्रम पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात पहिल्यांदाच झाला आहे. औसेकर महाराज व उपस्थित कीर्तनकार, प्रवचनकारांनी आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक केले.
 

भामचंद्र डोंगर भूमीच्या परिसरात राहणारे लोक भाग्यवान असून या पवित्र भूमीला जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा स्पर्श  झाला. परमेश्वराने त्यांना इथे साक्षात्कार दिला या भूमीचे दर्शन घेण्यासाठी सामान्य लोकांना इथे येता आले पाहिजे. म्हणून इथली शांतता आणि निसर्ग टिकवत इथे सुविधा निर्माण केल्या पाहिजे. गुहेत तपश्चर्या करणारे तुकाराम महाराज सारखे महात्मे यापुढे होणे नाही. भामचंद्र डोंगराचा विकास व्हावा यासाठी आपण देखील शासन पातळीवर मुख्यमंत्र्यांशी बोलून सहकार्य करू.
हभप गहिनीनाथ महाराज औसेकर - सहअध्यक्ष,श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती,पंढरपूर 

 


ग्रामीण भागामध्ये वारकरी संप्रदायाच्या अनुयायांनी परमेश्वराच्या नामस्मरणातून भक्ती भावाने गावातील प्रेम,सामाजिक समता आणि गावाची बैठक टिकवण्याचे काम केले. अंत्यविधी संस्कार सेवा कार्य करणारे आमचे नागरिक अतिशय निस्वार्थीपणाने हे काम करतात.त्यांचा सन्मान होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम केला.
शरद बुट्टे पाटील - अध्यक्ष कमलाई प्रतिष्ठान