explosion of domestic gas cylinder | घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, मोठा अनर्थ टळला
खेड तालुक्यातील मंदोशी येथील घटना
महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मंदोशी गावात मंगळवारी रात्री सुमारे साडेआठ वाजता शांताबाई सिताराम गोडे यांच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत शांताबाई यांचा पुतण्या लहू तुकाराम गोडे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आणि काही संयोगामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती अशी की, रात्री थंडी जास्त असल्याने शांताबाई गोडे, त्यांची सून जयश्री आणि नातू आरव हे तिघे घराबाहेर बसले होते. याच वेळी घरातून गॅसचा तीव्र वास येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गॅस गळतीची चौकशी करण्यासाठी लहू गोडे घरात गेले. मात्र, त्यांच्या प्रवेशाच्या काही क्षणांतच अचानक मोठा स्फोट होऊन घरात आग भडकली. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, घराच्या छतावरील टी-अँगलची फरशी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर वरच्या मजल्यावरील सिमेंटच्या पत्र्याही तुटून पडल्या.
स्फोटानंतर ग्रामस्थांनी धाव घेऊन तत्परता दाखवली आणि आगीतून खालच्या मजल्यावरील गॅस सिलेंडर बाहेर काढले. यामुळे पुढील साखळी स्फोट टळला आणि मोठी जीवितहानी थांबली. विशेष बाब म्हणजे, घराच्या वरच्या मजल्यावर दोन भरलेले गॅस सिलेंडर होते. सुदैवाने त्यांचा स्फोट झाला नाही. त्या मजल्यावर राहणारे कुटुंब कामानिमित्त कल्याण येथे गेले असल्याने ते या अपघातातून वाचले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि स्थानिक गॅस एजन्सीला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गॅस गळती हेच मुख्य कारण असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
