Bhairavnath Patsanstha Vision 2032 | व्हिजन २०३२ अंतर्गत भैरवनाथ पतसंस्थेची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न; साडेतीन हजार कोटींच्या उलाढालीचे उद्दिष्ट

संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसंकुल, लांडेवाडी येथे आयोजन; आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सेवा, कर्मचारी कौशल्यविकास आणि व्यवसायवाढीवर भर.

Bhairavnath Patsanstha Vision 2032 | व्हिजन २०३२ अंतर्गत भैरवनाथ पतसंस्थेची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न; साडेतीन हजार कोटींच्या उलाढालीचे उद्दिष्ट

 

महावार्ता लाईव्ह | भैरवनाथ पतसंस्थेच्या व्हिजन २०३२ अंतर्गत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्ग व संचालक मंडळाची दोन दिवसीय विशेष कार्यशाळा शिवसंकुल, लांडेवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळा स्कूल ऑफ इन्स्पायरेशनल लीडरशिप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

 

संस्थेची प्रगती कर्मचारी टीमवर्क आणि उत्तम ग्राहक सेवा

कार्यशाळेदरम्यान संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात सखोल विचारमंथन करण्यात आले. व्हिजन २०३२ अंतर्गत संस्थेचा विस्तार, सभासदकेंद्री सेवा, ठेवी व कर्ज व्यवसायाची वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कर्मचारी कौशल्यविकास, नेतृत्वगुणांचा विकास आणि संस्थेला अधिक सक्षम व आधुनिक वित्तीय संस्था बनविण्याच्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

 

संस्थेच्या पुढील दशकातील उद्दिष्टांची स्पष्ट दिशा निश्चित करताना “संस्थेची प्रगती ही प्रत्येक कर्मचारी, अधिकारी, संचालक आणि सभासदाच्या सहभागातूनच शक्य आहे”, हा विचार कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आला. कार्यशाळेत कर्मचारी व संचालक मंडळामध्ये टीमवर्क, नेतृत्व, सकारात्मक दृष्टिकोन, जबाबदारीची जाणीव, ग्राहकसेवा आणि परिणामाभिमुख कार्यपद्धती याबाबत विविध उपक्रम व मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली.

 

सक्षम,पारदर्शक कारभार; उलाढाल साडेतीन हजार कोटी

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबाबत मार्गदर्शन करताना, बदलत्या आर्थिक व तंत्रज्ञानाच्या युगात संस्थेने नव्या संधींचा स्वीकार करून अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून पुढे जाण्याची गरज व्यक्त केली. नजीकच्या भविष्यकाळात संस्थेची उलाढाल तीन,साडेतीन हजार कोटींच्या पुढे नेण्याचा मानस केला. संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन भविष्यकालीन संस्थेच्या वाटचालीची भूमिका विषद केली तसेच कर्मचारी वर्गाने आपली क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले.

 

व्हिजन २०३२ उज्वल भविष्यासाठी संकल्प

व्हिजन २०३२ हे केवळ एक उद्दिष्ट नसून संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.दोन दिवसीय कार्यशाळेमुळे कर्मचारी वर्ग व संचालक मंडळामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संस्थेच्या आगामी वाटचालीसाठी नवीन ऊर्जा, स्पष्ट दिशा आणि एकजुटीची भावना निर्माण झाली आहे. याप्रसंगी डायनालॉग इंडियाचे कार्यकारी संचालक अक्षयआढळराव पाटील, एस आय एल संस्थेचे संचालक डॉ. योगेश पवार, सतिश नायर, मानसी प्रभुदेसाई, काजल मालापुडी, उत्कर्ष जुनेजा व सहकारी, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सौ. कल्पना आढळराव पाटील, महेश ढमढेरे, हनुमंत तागड, अभिमन्यू लांडगे, शोभा आवटे, अंजली थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे, सर्व शाखाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

 


व्हिजन २०३२ अंतर्गत संस्थेला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम, आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सभासदाभिमुख वित्तीय संस्था म्हणून विकसित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. व्यवसायाचा नियोजनबद्ध विस्तार, ठेवी व कर्ज व्यवसायात भरीव वाढ, डिजिटल बँकिंग व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,चौकट उत्कृष्ट ग्राहकसेवा, सक्षम मनुष्यबळ निर्मिती आणि पारदर्शक व विश्वासार्ह कार्यपद्धती यावर विशेष भर देण्यात येणार आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीतील संधींचा योग्य वापर करून संस्थेची कार्यक्षमता, नफा, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करणे, हे व्हिजन २०३२चे प्रमुख लक्ष्य आहे.