चोरीच्या हेतूने फिरताना संशयित जेरबंद ; संशयिताकडून तीन मोबाईल जप्त
शिक्रापूर येथील घटना
शिक्रापूर : कोंढापुरी (ता. शिरुर) येथील एका मंदिराच्या परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद करत त्याचेवर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून सोमनाथ उर्फ सोन्या भिकाजी कदम असे शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कोंढापुरी (ता. शिरुर) येथील म्हसोबा मंदिराच्या परिसरात आज पहाटेच्या सुमारास एक युवक संशयितपणे फिरत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यांनतर पोलीस नाईक अमोल दांडगे, संतोष पवार, होमगार्ड साहिल तांबोळी यांनी सदर ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी त्यांना तेथे एक युवक संशयितपणे दिसून आला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करत पकडले त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सीम कार्ड नसलेले तीन वेगवेगळे मोबाईल मिळून आले.
तसेच पोलिसांनी त्याच्या नावाबाबत चौकशी करत तपासणी केली असता त्याचेवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. याबाबत पोलीस नाईक अमोल अंबादास दांडगे वय ३६ वर्षे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सोमनाथ उर्फ सोन्या भिकाजी कदम (वय २५) रा. बुरडगाव ता. अहमदनगर जि. अहमदनगर याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष पवार हे करत आहे.
----------------------------------◆◆◆----------------------------------
