Crime News | राजगुरुनगर शहरानजीक भरदिवसा धाडसी चोरी ; 80 तोळे सोन्यासह कोट्यवधींचा ऐवज लंपास
होलेवाडी गावच्या हद्दीतील ‘श्री’ अपार्टमेंट या रहिवासी सोसायटीत चोरी
महावार्ता लाईव्ह | राजगुरुनगर शहरानजीक होलेवाडी गावच्या हद्दीतील ‘श्री’ अपार्टमेंट या रहिवासी सोसायटीमध्ये शनिवारी (दि. 3 जानेवारी) भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडली. देवदर्शनासाठी घर बंद ठेवून अक्कलकोट येथे गेलेल्या गदिया कुटुंबाच्या फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल 80 तोळे सोन्याचे दागिने, रोकड तसेच मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. या चोरीत कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गदिया परिवार शनिवारी सकाळी कुटुंबासह अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेला होता. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दुपारच्या सुमारास ‘श्री’ अपार्टमेंटमधील त्यांचा फ्लॅट लक्ष करून मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटे फोडत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू चोरून नेल्या.
विशेष म्हणजे, ही संपूर्ण चोरी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये संशयित चोरटे दिसून येत असून पोलिसांकडून त्याचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. चोरीची माहिती मिळताच खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ठसेतज्ज्ञांना पाचारण करून घरातून बोटांचे ठसे घेण्यात आले असून श्वानपथकाच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भरदिवसा वस्ती असलेल्या भागात अशी धाडसी चोरी झाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.
