संतोषनगरच्या जांभूळदरा जि.प. शाळेत ' आठवडे बाजार व खाऊगल्ली ' उपक्रम
" ताजी भाजी, वडापाव स्वस्तात मस्त..’ अशी आरोळी देत ग्राहकांना विद्यार्थ्यांनी केले आकर्षित ; हजारो रुपयांची उलाढाल
Santoshanagar zp school
महावार्ता लाईव्ह | शालेय अभ्यासक्रमाबरोबरच दैनंदिन जीवनातील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने संतोषनगर (ता. खेड ) जांभूळदरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी किलबिल भाजी बाजार व खाऊगल्लीचे आयोजन केले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मुला- मुलीच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामान्यज्ञान वाढविणे, दैनंदिन व्यवहार, बाजार खरेदी-विक्रीचा व नफा-तोटाचा अनुभव, संवाद कौशल्य, बौद्धिक क्षमता वाढविणे या उद्देशाने शाळेच्या प्रागंणात किलबिल भाजी बाजाराचे आयोजन केले होते. मुलांनी शेतातील विविध पालेभाज्या, फळेभाज्या आणल्या होत्या. विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल विक्रीसाठी मांडले होते.
'ताजी भाजी, वडापाव स्वस्तात मस्त..’ अशी आरोळी देत ग्राहकांना विद्यार्थी आकर्षित करत होते. खरेदीसाठी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ग्रामस्थांनी खरेदीबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी हजारोंची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांसाठी किलबिल भाजी बाजार व खाऊगल्लीचे आयोजन मुख्याध्यापक भास्कर गाडगे व सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी संतोषनगरचे लोकनियुक्त सरपंच शरद कड, उपसरपंच तुषार कड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कड, उपाध्यक्षा सविता भोसले, ग्रामसेवक संजिवनी बागडे तसेच पालक, ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
