राजगुरूनगरमध्ये चातुर्मासानिमित्त प.पू. वाणीभूषण प्रीतीसुधाजी महाराजसाब जयंती आजपासून; धार्मिक कार्यक्रमांची उत्साहात सुरुवात

भक्तिगीतांच्या पेन ड्राइव्हचे प्रकाशन, पुस्तिका अनावरण, प्रेरणादायी व्याख्याने आणि महाराष्ट्रभरातील भाविकांची उपस्थिती राहणार

राजगुरूनगरमध्ये चातुर्मासानिमित्त प.पू. वाणीभूषण प्रीतीसुधाजी महाराजसाब जयंती आजपासून; धार्मिक कार्यक्रमांची उत्साहात सुरुवात

 

महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर येथे यंदाच्या जैन चातुर्मासाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून प.पू. वाणीभूषण प्रीतीसुधाजी महाराजसाब यांच्या जयंतीनिमित्त आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यक्रम उद्या सकाळी पार पडणार असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत.

 

सध्या राजगुरूनगरमध्ये प्रवचन प्रभाकर प.पू. श्री. प्रशांतऋषीजी महाराजसाहेब, स्वरसम्राज्ञी मधुस्मिताजी महाराजसाहब आणि मधुरवाणी विजयस्मिताजी महाराजसाब यांचा चातुर्मास सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या जैन संघांपैकी एक म्हणून राजगुरूनगर जैन संघाची ओळख आहे.

 

जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प.पू. वाणीभूषण प्रीतीसुधाजी महाराजसाबांना समर्पित भक्तिगीतांच्या पेन ड्राइव्हचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या पेन ड्राइव्हमधील काही भक्तिगीते स्वरसम्राज्ञी मधुस्मिताजी महाराजसाब यांनी रचली आहेत. तसेच प्रीतीसुधाजी महाराजसाहब यांच्या जीवनकार्यावर आधारित गुरु प्रशांतऋषीजी महाराजसाहब यांनी लिहिलेल्या पुस्तिकेचेही प्रकाशन होणार आहे.

 

यानंतर प्रीतीसुधाजी महाराजसाब यांच्या कार्य व व्यक्तिमत्त्वावर विविध मान्यवरांची भाषणे आयोजित करण्यात आली आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनात सकारात्मक अनुभव आलेले अनेक भाविक महाराष्ट्रातील विविध भागांतून या कार्यक्रमासाठी राजगुरूनगर येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 

कार्यक्रमासाठी विशेष पोशाख संहिताही जाहीर करण्यात आली असून पुरुषांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, तर महिलांनी गुलाबी रंगाची साडी परिधान करून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यांसह नाशिक परिसरातील अनेक भाविक या जयंती सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती राजगुरूनगर जैन संघाचे अध्यक्ष अजय बलदोटा यांनी दिली.