रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ; आश्वासनानंतर मनसेचे विवेक येवले यांचे उपोषण मागे

आश्वासनांवर कारवाई न केल्यास पुन्हा उपोषण करू असा इशारा येवले यांनी दिला.

रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ; आश्वासनानंतर मनसेचे विवेक येवले यांचे  उपोषण मागे

चाकण : कान्हेवाडी तर्फे चाकण ते इंदोरी मावळ व कुंडमळा ते चैतन्य शाळा येथील डांबरीरस्ता उखडला आहे तसेच सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. हे निकृष्ट काम झाल्याचा आरोप करत इंदोरी येथे मनसेचे जनहित कक्षाचे तालुकाध्यक्ष विवेक येवले आमरण उपोषण यांनी केले.

 

संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी येवले यांच्याकडून इंदोरी येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले. रस्त्याचे काम गेली आठ महिन्यांपासून सुरू होते. सदर काम चुकीचे असल्याच्या आरोप तालुकाध्यक्ष विवेक येवले पाटील यांनी वारंवार केला परंतु संबंधित प्रशासनाकडून कसलीही कारवाई करण्यात आली नव्हती. पावसाळ्यात संपूर्ण डांबरी रस्ता पूर्ण पणे उखडला व सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडल्या असून अतिशय निकृष्ट काम झाल्याचे येवलेंनी स्पष्ट केले होते.

 

उपोषण सोडतावेळी प्रशासनाने रस्ता पुन्हा चांगल्या दर्जाचे मटेरीयल वापरून तयार करू असे आश्वासन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अभियंता वसंत नाईक व अभियंता सुयश शेवाळे यांनी दिल्याने येवले यांनी उपोषण मागे घेतले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांवर कारवाई न केल्यास पुन्हा उपोषण करू असा इशारा देखिल उपोषण सोडते वेळी विवेक येवले यांनी दिला.