राजगुरूनगर नगरपरिषदेवर पाण्यासाठी टाहो फोडीत प्रभाग ३ मधील महिलांचा हंडामोर्चा
सीईओ लाळगे यांचे गोड तर नगरसेविका त्यांचे ठोस आश्वासन

राजगुरूनगर : राजगुरूनगर नगरपरिषदेच्या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये गेल्या १५ दिवसांपासून नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत नाही. पाण्यावाचून नागरिकांचे प्रचंड हाल सुरु आहेत.या प्रमुख कारणास्तव वॉर्डातील ओमसाई मंडळ भागातील महिलांनी नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढून नगरपरिषदेत आंदोलन केले. संतप्त महिलांच्या हंडामोर्चा आणि पाणी पाहिजे या प्रमुख घोषणेने राजगुरूनगर नगरपरिषदेचे कार्यालय महिलांनी दणाणून सोडल्याने प्रशासन हादरले.
वार्ड क्रमांक तीन व वॉर्ड क्रमांक दोन हा भाग नगरपरिषद अस्तित्वात येण्यापूर्वी राक्षेवाडी ग्रामपंचायत हद्दीत होता.आजही या दोन्ही भागाला राक्षेवाडी ग्रामपंचायत १८ तास पाणी पुरवठा करीत आहे.परंतु राक्षेवाडी पाणीपुरवठा विहिरीचे पाणी आटले आहे.त्यामुळे राक्षेवाडी नागरिकांना देखील पाणी सोडताना अडचणी येत आहेत.विहिरीत पाणी नसल्यामुळे दोन्ही वॉर्डातील नागरिकांचा पाणी पुरवठा कमी केला आहे.वॉर्ड क्रमांक दोन व तीनचे नागरिक टॅक्स नगरपरिषदेला देतात,तरीही राक्षेवाडी ग्रामपंचायत पाणीपुरवठा दोन्ही वॉर्डाला करीत आहे.
मोर्चा प्रसंगी नगरपरिषदेत वॉर्ड क्रमांक तीन प्रभागाच्या कार्यक्षम नगरसेविका स्नेहल राक्षे,राक्षेवाडीचे कर्तबगार उपसरपंच मच्छिन्द्र राक्षे,माणिक होरे,सुदाम कराळे यांचेसह मालन पवार,अलका सांडभोर,शारदा सांडभोर,ममता गमरे, तेजस्विनी पाटील, अर्चना तांबे,निकिता साकोरे,सोनाली सोनवणे, शांताबाई काळे, अर्चना सांडभोर,मिरा कराळे,शोभा टाकळकर, रुपाली भोगाडे, संगिता शेटे,वैशाली वाडेकर,लक्ष्मी सांडभोर, सुनिता राठोड,सिद्धी कांबळे,चंद्रकला गोसावी,अरुणा घुले,सुनंदा बोरकर,रुपाली पवार,मालती पवार,नीलम गोरडे, छाया भोंडवे, मनीषा नाईकरे, रेश्मा खेडकर,सविता होले,प्रियंका सावंत आदी महिला मोठ्या संख्येने हंडा मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
आम्हांला दररोज नित्यनियमाने पाणीपुरवठा करावा. नवीन पाणी योजनेचे पाणी बंद झाले.कायमस्वरूपी पाण्याची तरतूद करावी.नाहीतर मोठे आंदोलन उभारले जाईल यासाठी मोर्चेकरी महिलांनी राजगुरूनगर नगरपरिषदेचे सिईओ श्रीकांत लाळगे यांना निवेदन दिले.

