समाजाला चिकित्सक, विज्ञानवादी तरुणांची गरज - अमोल मिटकरी
राजगुरूनगर : विशिष्ट वर्गाकडून राजकीय फायद्यासाठी विविध जाती-धर्मात दुही पसरवण्याचे काम सुरू असून आपल्याला लोकशाही, संविधान वाचवायचे असेल तर धर्म अथवा समाजव्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या चिकित्सक विज्ञानवादी तरुणांची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत उज्ज्वल भारताचे कालचे, आजचे व उद्याचे स्वप्न या विषयावर बोलत होते.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, हिरामण सातकर, अनिल राक्षे, ॲड. राजमाला बुट्टेपाटील, प्राचार्य डॉ. एस.एस.पिंगळे, डॉ.एच.एम.जरे, उपप्राचार्य प्रा. व्ही. बी. दौंडकर, प्रबंधक के. आर. पाचारणे उपस्थित होते.
अमोल मिटकरी पुढे म्हणाले की कालचा भारत विज्ञानवादी होता, आज मात्र धर्मवादाकडे कल झुकला असून उद्याचा भारत सर्वधर्मसमभाव मानणारा असायला हवा. संविधान हे सर्वश्रेष्ठ राष्ट्रग्रंथ असून माणुसकी शिकवणारा धर्म हाच खरा राष्ट्रधर्म आहे. आज तरूणांना जातीभेदावरील चर्चेची गरज नसून रोजगारावरील कृती कार्यक्रमाची आवश्यकता आहे. आज धर्म संकटात नसून अडचणीत आलेल्या शेतकरी, शोषित, वंचित घटकाला मदतीची गरज आहे.
ते पुढे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच होते, धर्मपंडित होते, तीच त्यांची सर्वसमावेशक प्रतिमा आहे. छत्रपती शाहू महाराज हे आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते असल्याचे सांगून लव्ह जिहाद या शब्दामुळे हिंदू-मुस्लिमांत तेढ निर्माण होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकशाही वाचविण्यासाठी महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू ही विचारांची साखळी असून तिचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांचा संविधानिक पदावरील व्यक्तीने केलेला अनादर खपवून घेणार नाही. भारत हा युवकांचा देश असून ज्या देशातील तरुण जागरूक तो देश कधीही गुलाम बनत नाही. असे सांगताना ते म्हणाले की तरुणांनी स्वतःचा रस्ता स्वतः शोधावा. विद्यार्थ्यांनी एक तरी कला स्वतःमध्ये जिवंत ठेवावी. कला तुम्हाला उपाशी मरू देणार नाही. विद्यार्थ्यांनी हुतात्मा राजगुरूंचे बलिदान आणि साहेबराव बुट्टेपाटील यांनी केलेली शैक्षणिक क्रांती न विसलता सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमेश जगताप यांनी परिचय डॉ. संजय शिंदे यांनी तर आभार श्रद्धा बालघरे हिने मानले.
