Khed Fraud News | खेड तालुक्यात १२ शेतकऱ्यांची सुमारे १३ लाखांची फसवणूक; जुन्नरच्या शेतकरी व्यापाऱ्यास अटक

विश्वास संपादन करून १२ शेतकऱ्यांना गंडा; १२.९७ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी शेतकरी व्यापाऱ्यास अटक ; खेड पोलिसांची तात्काळ कारवाई

Khed Fraud News | खेड तालुक्यात १२ शेतकऱ्यांची सुमारे १३ लाखांची फसवणूक; जुन्नरच्या शेतकरी व्यापाऱ्यास अटक

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील शिरोली, दावडी आणि खरपुडी खुर्द परिसरातील १२ शेतकऱ्यांकडून बटाटा, वांगी, कोथिंबीर, चिक्कू आणि शेवगा शेंगा असा शेतीमाल खरेदी करून तब्बल १२ लाख ९७ हजार ८९६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जुन्नर तालुक्यातील एका व्यापाऱ्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

या प्रकरणातील आरोपीचे नाव अरुण गुलाब जेडगुले (रा. वाणीमळा, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आहे. याबाबत संतोष लक्ष्मण मलघे (वय ४२, व्यवसाय शेती, रा. खरपुडी खुर्द, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 

फिर्यादीनुसार, आरोपी अरुण जेडगुले हा  शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करून पुढे व्यापाऱ्यांना विक्री करत असल्याचे सांगत होता. सुरुवातीला त्याने काही व्यवहारांमध्ये वेळेवर पैसे देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. संतोष मलघे यांनी २१ मे २०२५ रोजी वांगी तसेच २८ जानेवारी २०२५ रोजी वांगी व कोथिंबीर विकल्यानंतर त्याचे पैसे वेळेत मिळाल्याने जेडगुलेवर विश्वास निर्माण झाला.

 

यानंतर आरोपीने संतोष मलघे यांच्यासह पंडित काळुराम गाडे, तानाजी रघुनाथ मलघे, उल्हास चिंधा काळे, संभाजी बबन मलघे (सर्व रा. खरपुडी खुर्द), शिवाजी विठ्ठल मांजरे (रा. पिंपळाची मांजरेवाडी), गणेश विठ्ठल जोशी, बाळासाहेब सिताराम जोशी (रा. खरपुडी बुद्रुक), तसेच काळुराम चिगन गुंडाळ, रविंद्र यशवंत बोत्रे, विजय मारुती तनपुरे आणि गणपत तनपुरे (सर्व रा. दावडी) या शेतकऱ्यांकडून विविध प्रकारचा शेतीमाल उधारीवर घेतला. मात्र मालाची विक्री करूनही त्यांना पैसे दिले नाहीत, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २८ जानेवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीमाल खरेदी केला होता. यामध्ये १५ टन ४ क्विंटल बटाटा (प्रति किलो १६ रुपये दराने) सुमारे २ लाख ४६ हजार ४०० रुपये, ३ टन ८१ किलो वांगी (प्रति किलो २५ रुपये दराने) ७७ हजार रुपये, ६१० किलो चिक्कू (प्रति किलो ६० रुपये दराने) ३६ हजार ६०० रुपये, १,४०० जुड्या कोथिंबीर (प्रति जुडी १० रुपये दराने) १४ हजार रुपये, तसेच ११० किलो शेवगा शेंगा (प्रति किलो ५० रुपये दराने) ५ हजार ५०० रुपये किमतीचा माल खरेदी करण्यात आला होता. इतर शेतकऱ्यांच्या मालासह एकूण फसवणुकीची रक्कम १२ लाख ९७ हजार ८९६ रुपये इतकी असल्याचे तपासात समोर आले आहे.

 

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) व ३१८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अरुण जेडगुले याला अटक केली. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गरड हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.