Corporation election | राजगुरूनगर नगरपरिषद निवडणूक ; तिसऱ्या दिवशी केवळ ८ अर्ज
राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल
महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी (दि. ११ नोव्हेंबर) पासून सुरू झाली. मात्र, इच्छुक उमेदवारांनी या प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात ही प्रक्रिया सुरू असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत आहे.
तिसऱ्या दिवशी (दि. १३ नोव्हेंबर) काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात प्रभाग क्रमांक ३ मधून सर्वसाधारण महिलेसाठी माजी नगरसेविका स्नेहल मच्छिंद्र राक्षे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि अपक्ष अशा दोन संचात उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक १० मधून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सर्वसाधारण महिलेसाठी सुप्रिया राहुल पिंगळे, छाया धनंजय पिंगळे आणि अनुसूचित जाती मधून अरविंद गजानन गायकवाड यांचा समावेश आहे. हे उमेदवार पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
तसेच, प्रभाग क्रमांक ८ मधून सर्वसाधारणसाठी सुरेखा हरिभाऊ क्षेत्रीय यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
नगरपरिषदेच्या एकूण १० प्रभागांपैकी अनेक प्रभागांत अद्याप उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. स्थानिक राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू असून, प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची यादी अंतिम होण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजपा, शिवसेना शिंदे गट आदी पक्षांकडून अद्याप मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झालेले नाहीत.
उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास उत्साह दाखवला नाही, यामुळे निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार उतरतील, याबाबत उत्सुकता आहे.
