Corporation election | राजगुरूनगर नगरपरिषद निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही! 

शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदेगट ) यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता

Corporation election | राजगुरूनगर नगरपरिषद निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही! 

 

महावार्ता लाईव्ह | राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी (१० नोव्हेंबर २०२५) पासून सुरू झाली. मात्र, राजगुरूनगर नगरपरिषदेच्या इच्छुक उमेदवारांनी पहिल्या दिवशी अर्ज दाखल करण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून मिळाली.

 


राजगुरूनगर नगरपरिषद येथे एकूण १० प्रभाग आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रशासकाच्या कारभारामुळे रखडलेल्या या निवडणुकीकडे राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे लक्ष लागले होते. राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असता, १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत निश्चित केली आहे. अर्ज छाननी १८ नोव्हेंबरला होईल, तर २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान २ डिसेंबरला आणि निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

 


राजगुरूनगर नगरपरिषदांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदेगट ) यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. पक्षांच्या अधिकृत उमेदवार यादी जाहीर होण्यास विलंब झाल्याने इच्छुक उमेदवार प्रतीक्षा करत आहेत. काही ठिकाणी अपक्ष म्हणून उतरण्याची तयारी सुरू असली, तरी पहिल्या दिवशी गर्दी नव्हती. 

 

निवडणूक आयोगाने खर्चमर्यादा निश्चित केली असून, नगराध्यक्षपदासाठी १५ लाख आणि सदस्यांसाठी ७ लाख रुपये खर्च करता येईल. जातपडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असल्यानेही काही उमेदवार प्रतीक्षेत आहेत. आता पुढील सहा दिवसांत अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राजगुरूनगरच्या राजकारणात कोणता पक्ष वरचष्मा दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.