पहाटेच्या अतिवृष्टीने राजगुरूनगर जलमय; प्रभाग क्रमांक ६ ला सर्वाधिक फटका, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
घरांमध्ये शिरले पाणी, अतिक्रमण व अपुरी आपत्कालीन यंत्रणा कारणीभूत असल्याची नागरिकांची भावना; नगरसेविका श्वेता ढोले यांनी कर्मचाऱ्यांसह मदतकार्य केले
महावार्ता लाईव्ह | पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे राजगुरूनगर शहर जलमय झाले असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले, तर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पहाटेपासून झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह अडवणारी अतिक्रमणे आणि अपुरा निचरा यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. तसेच प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा परिस्थिती हाताळण्यात कमी पडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका श्वेता सोमनाथ ढोले यांनी पहाटेपासूनच परिस्थितीवर लक्ष ठेवून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसह आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पूरग्रस्त भागात मदतकार्य केल्याची माहिती दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, "आज पहाटे पाच वाजल्यापासून नागरिकांचे मदतीसाठी फोन येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही तातडीने पूरस्थितीवर लक्ष केंद्रित केले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने विविध ठिकाणी मदतकार्य राबवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला."
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधित नागरिकांना तातडीने मदत द्यावी, तसेच शहरातील पाणी निचऱ्याच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.