ACB red manchar bribe | आंबेगाव प्रांत कार्यालयात खळबळ: प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार लाच प्रकरणात रंगेहाथ अटक
लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना जागीच अटक ; सध्या मंचर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचे सहकारी कर्मचारी खैरनार यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून, परिसरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एका तक्रारदाराकडून माहिती मिळाली होती की, प्रांत कार्यालयातील संबंधित कामासाठी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि कर्मचारी खैरनार यांनी लाच मागितली आहे. या माहितीच्या आधारे ACB अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताना दोघांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना जागीच अटक करण्यात आली. सध्या मंचर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोघांना पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले असून, त्यांच्याकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
थेट प्रांत अधिकारी या उच्च पदावरील अधिकारी लाच प्रकरणात अडकल्याने प्रशासनात मोठा धक्का बसला आहे. आंबेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये या घटनेची आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेकांनी याला “प्रशासनातील भ्रष्टाचाराचे उघड उदाहरण” म्हणून संबोधले आहे.
या प्रकरणामुळे आंबेगाव तालुक्यातील इतर कार्यालयांमध्येही सतर्कता वाढली असून, कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचाराविरोधातील ही कारवाई नागरिकांसाठी दिलासादायक मानली जात असली तरी, प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.