Nilesh Takalkar Elected SMC President | टाकळकरवाडी जि. प. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निलेश टाकळकर; उपाध्यक्षपदी बापूसाहेब टाकळकर
शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संकल्प
महावार्ता लाईव्ह | टाकळकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची (SMC) पुनर्रचना नुकतीच उत्साहात पार पडली. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी निलेश संजय टाकळकर, तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब भीमसेन टाकळकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
शाळेच्या सभागृहात आयोजित विशेष सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भौतिक सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शाळेच्या विकासासाठी पालक व ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे असून, सर्वांच्या सहभागातून शाळेच्या प्रगतीला चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी रासोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कैलास टाकळकर, महाराष्ट्र पोलीस नितीन पवार, अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर, मुख्याध्यापक सदानंद माळशिरसकर, सुरेश आदक सर, रामेश्वर झुळूक सर यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीच्या पालक प्रतिनिधींमध्ये आकाश टाकळकर, माधुरी साकोरे, नितीन पवार, शीतल टाकळकर, प्राजक्ता टाकळकर, सुचिता टाकळकर, पल्लवी देशमुख, सुषमा टाकळकर, प्रतिभा पवार, पूजा टाकळकर, नीता टाकळकर आणि सुप्रिया टाकळकर यांचा समावेश होता.
निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश टाकळकर व उपाध्यक्ष बापूसाहेब टाकळकर यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पालक, ग्रामस्थ व मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक सदानंद माळशिरसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.