Pune Takalkarwadi Health Sub-Center | टाकळकरवाडी आरोग्य उपकेंद्राचा राज्यात गौरव; राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्राने सन्मान
९४.८० टक्के गुणांसह गुणवत्ता दर्जा प्राप्त; शरद बुट्टे पाटील यांनी आरोग्य कर्मचारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे केले अभिनंदन, विकासकामांसाठी सहकार्याचे दिले आश्वासन
महावार्ता लाईव्ह | राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राकडून खेड तालुक्यातील टाकळकरवाडी आरोग्य उपकेंद्राला गुणवत्ता दर्जा प्रमाणपत्र मिळाले आहे. या उपकेंद्राच्या आरोग्य सेवांसाठी ९४.८० टक्के गुण मिळाले आहेत. राज्यामध्ये अव्वल ठरलेल्या या उपकेंद्रात आरोग्य सेवा देण्यामध्ये योगदान देणारे गावचे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपकेंद्रावर स्वतः जाऊन जिल्हा परिषदेचे माजी सभापती व विद्यमान जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन करून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

यावेळी रासोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कैलासराव टाकळकर यांच्या माध्यमातून या आरोग्य उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीसाठी बुट्टे पाटील यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता.यामुळे उपकेंद्राला संरक्षणभिंतीचे काम झाले.बुट्टे पाटील यांनी या उपकेंद्राला भेट दिली असता ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटी संचालक यासह गावचे प्रमुख कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
बुट्टे पाटील यांनी उपकेंद्राच्या आरोग्य सेवांची बारकाईने माहिती घेतली. या उपकेंद्रातील सेवांचा उपयोग इतर उपकेंद्राच्या कामकाजाला गती देण्यासाठी नक्कीच होईल. असे बुट्टे पाटील बोलताना म्हणाले. या उपकेंद्रामध्ये काही सुधारणांची खूप आवश्यकता असून त्यासाठी जिल्हा परिषदे कडून निधी मिळावा अशी मागणी यावेळी उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायतीने केली असता सर्व विकासकामांना सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित सर्वांना बुट्टे पाटील यांनी दिल्याने टाकळकरवाडी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.