डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पुणे मनपाचे क्रीडा अधिकारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते शिवराजला क्रीडा अधिकारी पदाचे पत्र देण्यात आले ; पै.शिवराज राक्षेला शासकीय नोकरी मिळाल्याने ग्रामस्थांकडून कौतुक
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे
Double Maharashtra Kesari Shivraj Rakshe Pune Municipal Sports Officer
राजगुरुनगर : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज काळुराम राक्षे यांना पुणे महानगरपालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून शासकीय नोकरी मिळाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिपत्रक काढून तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत.पै.शिवराजच्या कष्टाचं चीझ झाल्याच्या भावना राक्षेवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राक्षेवाडी गावचे शेतकरी कुटुंबातील असलेले पैलवान शिवराज राक्षे यांनी कुस्ती क्षेत्रात डबल महाराष्ट्र केसरी 'किताब मिळविला आहे.एकदा नाहीतर दोनवेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी शासकीय नोकरीत घेण्याचा निर्णय परिपत्रक काढून केला.मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांचे हस्ते शिवराजला क्रीडा अधिकारी पदाचे पत्र देण्यात आले. यावेळी मंत्री शंभूराज देसाई व शिवराजचा भाऊ युवराज राक्षे उपस्थित होते.एकदोन दिवसात शिवराज पदभार स्वीकारणार आहे.
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंच्या पाठीशी सरकार भक्कम असल्याचं मुख्यमंत्री शिंदे दाखवल आहे.शिवराज याने महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचं पुण्यात मैदान मारलं होतं.त्यानंतर धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने हर्षेवर्धन सदगीर याला चीतपट केले आणि डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला.
शिवराजला त्याच्या घरातूनच म्हणजे वडिलांकडून कुस्तीचे धडे शिकवले गेले.शिवराजचे वडिल व आजोबा यांनी देखील पैलवानकी करताना अनेक मैदान गाजविले होते.राक्षे कुटुंबाची इच्छा होती की शिवराजने महाराष्ट्र केसरीचं मैदान मारून चांदीची गदा मिळवावी.वडील पै काळुराम राक्षे हे शेतीबरोबर दुधाचा व्यवसाय करतात.आई सुरेखा राक्षे राक्षेवाडी गावच्या सरपंच आहेत.भाऊ,चुलते या घरच्यांनीही शिवराजला काहीही कमी पडू दिलं नाही.घरातून भक्कम पाठिंबा मिळाल्याने शिवराजने कुस्तीचे मैदान गाजविले.आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या तालमीमध्ये शिवराज सराव करीत असतो.
पुणे मनपा मध्ये क्रीडा अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे, माजी उपसभापती सतीश राक्षे,माजी जि.प.सदस्य जितेंद्र राक्षे, सरपंच सुरेखा राक्षे,उपसरपंच मच्छिन्द्र राक्षे,पोलीसपाटील पप्पूकाका राक्षे,सदस्य रविराज राक्षे, जितेंद्र सांडभोर,सविता राक्षे,श्रद्धा सांडभोर,वैजयंता थिटे,चांगुणा थिटे आदींनी आनंद व्यक्त केला.
