मोहिते पाटलांच्या टीकेनंतर वळसे पाटील थेट आजोळी; मोहकल-वेताळे दौऱ्याने राजकीय चर्चांना उधाण

आजोळची भरभराट काय केली..या प्रश्नानंतर दुसऱ्याच दिवशी मोहकलला भेट; ग्रामस्थांकडून विकासकामांच्या मागण्या निधीचे आश्वासन

मोहिते पाटलांच्या टीकेनंतर वळसे पाटील थेट आजोळी; मोहकल-वेताळे दौऱ्याने राजकीय चर्चांना उधाण

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील चांडोली येथील शालिमार पॅलेसमध्ये सोमवारी (दि. १) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार मोहितेंनी आंबेगावचे आमदार वळसेंवर जोरदार टीका केली होती. "मंत्री असताना आजोळची काय भरभराट केली, एकदा बघा. तिथली सर्व कामे दिलीप मोहितेंनी केली आहेत," असा टोला त्यांनी वळसेंना लगावला होता.

 

टीकेनंतर दुसऱ्याच दिवशी मोहकल गावाला भेट

मोहिते पाटलांच्या या टीकेनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी (दि. २) दिलीप वळसे पाटील यांनी पत्नी किरण वळसे यांच्यासह आपल्या आईचे गाव असलेल्या खेड तालुक्यातील मोहकल येथे भेट दिली. त्यांनी नातेवाईकांची भेट घेत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी माजी सरपंच मारुती भागवत, गुलाब राऊत, महादेव रणपिसे, आदिनाथ रणपिसे, भानुदास रणपिसे, बाळासाहेब रणपिसे, बाळू तरडे, साहेबराव रणपिसे, ओंकार रणपिसे, नागेश रणपिसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

ग्रामस्थांनी मांडल्या विकासकामांच्या मागण्या

मोहकल भेटीदरम्यान ग्रामस्थांनी विविध विकासकामांच्या मागण्या वळसे पाटील यांच्यासमोर मांडल्या. त्यामध्ये भीमा नदीवरील मोहकल-सायगाव दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, स्मशानभूमी सुशोभीकरण, तीन पानंद रस्ते, राममंदिर सभामंडप, कान्हेवाडी येथील भोमेश्वर मंदिर सभामंडप, कानिफनाथ वस्तीसाठी सिमेंट काँक्रीट रस्ता तसेच डाव्या कालव्यावरील पूल व रस्त्याची कामे यांचा समावेश होता.

या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वळसे पाटील यांनी ग्रामस्थांना दिल्याची माहिती मिळाली आहे.

 

मावशीच्या वेताळे गावालाही दिली भेट

मोहकल येथील भेटीनंतर वळसे पाटील यांनी आपल्या मावशीचे गाव असलेल्या वेताळे येथे जाऊन मावशी राधाबाई बोंबले आणि कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

 

 

अचानक दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोहिते पाटलांच्या टीकेनंतर लगेचच वळसे पाटील यांनी मोहकल आणि वेताळे गावांना भेट दिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. हा दौरा केवळ कौटुंबिक भेटीपुरता मर्यादित होता की त्यामागे राजकीय संदेश दडलेला आहे, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.

खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.परंतु मोहकल ग्रामस्थांकडून बंधारा, रस्ते, पूल व सभामंडपांसह विविध विकासकामांच्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर वळसे पाटलांचे निधीचे आश्वासन ग्रामस्थांना मिळाले आहे. वळसे पाटलांच्या अचानक भेटीने अनेक तर्कवितर्क व्यक्त करीत चर्चा मात्र चांगल्याच रंगल्या आहेत.