खेड तालुक्यातील पाणी टंचाई निवारण करण्यासाठी टंचाई आराखड्यातील कामे प्राधान्याने मार्गी लावणार : सभापती अमोल नलावडे
१२ कोटींच्या टंचाई आराखड्याला प्राधान्य; १६ गावांसाठी टँकरचे नियोजन ; विहीर खोलीकरण, नवीन बोअरवेल आणि पाणी साठवण टाक्यांची कामे होणार; खेड तालुक्यात पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाला सूचना – अमोल नलावडे
महावार्ता लाईव्ह | अल-निनो मुळे उद्भवलेल्या पाणी टंचाई संकटावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाण्याचे संकट निवारण करण्यासाठी नवनवीन टंचाई निवारणाची सर्व कामे सुचवावीत ती कामे प्राधान्याने केली जातील.खेड तालुक्यासाठी १२ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. तालुक्यातील विशेषतः १६ गावे आणि त्या गावांच्या वाडीवस्तीवर टँकर सुरू करणेबाबतचा आराखडा तात्काळ सादर करावा आणि काय उपाययोजना करायच्या आहेत त्यांची सविस्तर माहिती द्यावी. खेड पंचायत समितीचा सभापती म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षांना विचारून आलो आहे.खेड तालुक्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही.असे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती तथा खेड पंचायत समितीचे सभापती अमोल नलावडे यांनी दिले.

खेड पंचायत समितीची आढावा बैठक राजगुरूनगर येथील पंचायत समितीच्या राजेशिवछत्रपती सभागृहात खेड पंचायत समितीचे सभापती अमोल नलावडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, जिल्हा परीषद सदस्य व जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते विजयसिंह शिंदे सदस्या सुनीता बुट्टे पाटील, तनुजा घनवट, गणेश बोत्रे, दीप्ती भोगाडे, समीर सुपे, पंचायत समिती सदस्य महेंद्र मेदनकर, शंकर कावडे, श्रद्धा मांडेकर, अश्विनी तरस, निखिल थोरवे, मनीषा हिले, दिनेश हांडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता कालिका खरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास माने, पंचायत समिती कृषी अधिकारी सोनाली पवार, पंचायत विस्तार अधिकारी सुखदेव साळुंके, बी.बी.मोरे, व्ही एम बहिरट, शाखा अभियंता एस.एम.शृंगारे, कनिष्ठ अभियंता एसएस सैदाने, एन.ए.पाटेकर यासह अनेक विभागाचे खातेप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा विहीर खोलीकरण, नवीन बोअर,विंधन विहीर यांची मागणी केल्यास तात्काळ कामे सुरू.खडकातील पाणी साठवण टाकीचे कामे केली जातील.मागच्या काळात फंड नव्हता आता फंड आल्यामुळे रखडलेली कामे लवकर होतील.संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय कोणताही अधिकारी बील देणार नाही याची काळजी घेतली जाईल.खेड तालुक्याचा सभापती म्हणून १२ कोटींच्या टंचाई आराखड्यातील सुचविलेली कामे प्राधान्याने मार्गी लावून पाणी टंचाईचे संकट दूर केले जाईल.
अमोल नलावडे - सभापती
महेंद्र मेदनकर - पाणी योजना किती कोटींच्या आहेत माहिती द्यावी काम न होताच संबंधित ठेकेदाराला बील देऊ नये.पाण्याच्या टाक्या बांधल्यात बाहेरून प्लॅस्टर पण आतून प्लॅस्टर नाही या कामांची चौकशी झाली पाहिजे.
सुनीता बुट्टे पाटील - तालुक्याच्या गावागावात असलेल्या पाझर तलावातील शेती साठी होणार उपसा थांबवला पाहिजे. म्हणजे पिण्यासाठी पाणी उन्हाळ्यापर्यंत टिकेल.पशुधनाचे पाण्याअभावी हाल होणार नाहीत.याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.
टोकावडे येथील बंधारा दुरुस्तीला पैसे नाहीत आणि लोखंडी ढापे देखील नाहीत.यामुळे बंधाऱ्यात पाणी कसे अडवले जाणार हा मुद्दा आढावा बैठकीत गाजला.या विभागाचे अधिकारी काळजीपूर्वक दक्ष नाहीत हेही सिद्ध झाले.
जलजीवन मिशन योजना प्रत्येक गावासाठी मंजूर आहे.आठ सदस्यांना समान निधी द्यावा.पाणीपुरवठा योजना बाबत सोक्षमोक्ष लावण्यासाठी ठेकेदार यांची बैठक लावू.अनेक पाणी योजना वीज कनेक्शन अभावी सुरू नाहीत. भविष्यात एकही टँकर लागणार नाही म्हणून उपाययोजना केली जाईल. प्रशासनाने कोणालाही पाठीशी घालू नये.९ प्रकारची कामे टंचाई मधून केली जातील.पाणी टंचाई होणार असल्याने तालुक्यातील धरणातील पाणी आरक्षित होणार असून जिथे टंचाई भासणार तिथे पाणी सोडले जाईल.
बाबाजी काळे - आमदार खेड तालुका

जिल्हा परिषद सदस्यांसह पंचायत समितीचे सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यांच्या सर्व प्रश्नांना सभापती नलावडे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.गटविकास अधिकारी यांनी बैठकीत आलेले पदाधिकारी यांचे स्वागत केले.आभार सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर यांनी मानले.
खेड पंचायत समितीच्या आढावा आणि टंचाई निवारण बैठकीला राजकीय सहलीवर गेलेले शिवसेना (उबाठा) पक्षाचे पंचायत समितीचे सर्व सदस्य अनुपस्थित राहिले.मात्र बैठकीत त्यांनी काही काळ ऑनलाईन सहभाग घेतला.सभापती अमोल नलावडे यांनी सुरवातीच्या सत्रात आढावा बैठक आणि दुपार नंतरच्या सत्रात टंचाई निवारण आढावा बैठक घेतली.बैठकीत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आणि काही अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर देखील धरले.अशा पद्धतीने झालेली आढावा बैठक शांततेत संपन्न झाली.