शिक्षण आणि संशोधन एकत्रित असावे -  डॉ. अरविंद नातू

शिक्षण आणि संशोधन एकत्रित असावे -  डॉ. अरविंद नातू

राजगुरूनगर : संशोधनाचा खरा गाभा प्रश्नात असल्याने विद्यार्थ्यांना प्रश्न पडावेत, त्यांना उत्तरे शोधण्याची सवय लागावी, तरच संशोधक तयार होतील. त्यासाठी शालेय वयापासून शिक्षण आणि संशोधन एकाच वेळी तयार होणाऱ्या अभ्यासक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन आयसरचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अरविंद नातू यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत आपण निसर्गापासून काय शिकलो?  या विषयावर बोलत होते.

याप्रसंगी संस्था अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, डॉ. रोहिणी राक्षे, हिरामण सातकर, प्राचार्य डॉ. एस.एस.पिंगळे, डॉ.एच.एम.जरे,  उपप्राचार्य प्रा. व्ही. बी. दौंडकर, प्रबंधक के.आर.पाचारणे उपस्थित होते. 

डॉ. नातू पुढे म्हणाले की निरीक्षण वृत्तीतून संशोधक तयार होत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टी मागील शास्त्र समजून घेऊन जागरूकपणे विचार करण्याची वृत्ती अंगीकारावी. ते म्हणाले की संशोधक हा शहरी भागातीलच असतो असे नाही. कान, डोळे उघडे ठेवून चौकस बुद्धीने विचार करणारा सामान्य माणूसही संशोधक असतो. पाल भिंतीवर कशी चालते, शार्क मासा वेगात कसा पळतो, कमळाच्या पानावर पाणी कसे थांबत नाही, झुरळं अथवा कीटक गरजेप्रमाणे त्यांची उंची कशी कमी करतात, मधमाशी षटकोनी पोळे का बनवते, वारूळांची रचना विशिष्ट प्रकारची का असते यासारख्या प्रश्नांची उत्तरे शास्त्रीय रूपात शोधणे म्हणजे संशोधन असल्याचे ते म्हणाले.

जगातील सर्व शोध हे निसर्गापासून स्फूर्ती घेऊन तयार झाले आहेत. भारतामध्ये मात्र अजून एकाही नवीन औषधाचा शोध लागला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माणूस निसर्गापासून दूर गेल्यामुळे मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, तणाव असे आजार निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधन क्षेत्रात करिअरच्या खूप संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिल्पा टाकळकर यांनी, परिचय प्रा. सायली कुलकर्णी यांनी तर आभार दिव्या पिंगळे हिने मानले.