लोढुंगवाडी साकव पुलाचे काम रखडले; काँक्रीटने भरलेला हायवा ट्रक पलटी, चालक गंभीर जखमी 

पाईट हद्दीतील प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १६ वरील पुलाचे काम दीड वर्षांपासून संथ; कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

लोढुंगवाडी साकव पुलाचे काम रखडले; काँक्रीटने भरलेला हायवा ट्रक पलटी, चालक गंभीर जखमी 

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील पाईट गावाच्या हद्दीतील लोढुंगवाडी ओढ्यावर प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १६ वर सुरू असलेल्या साकव पुलाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून हे काम अपूर्ण अवस्थेत पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि कंत्राटदाराच्या संथ कामकाजामुळे पुलाचे बांधकाम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. दरम्यान, मंगळवारी (दि. २६) पुलाच्या कामासाठी काँक्रीट घेऊन आलेला हायवा ट्रक पलटी झाल्याने या प्रकरणाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक महिन्यांपासून बंद असलेले पुलाचे काम काही दिवसांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र कामाचा वेग अत्यंत मंद असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यापूर्वी या ठिकाणी करण्यात आलेला भराव खचल्याची घटना घडली होती. त्याच परिसरात पुलाच्या बांधकामासाठी काँक्रीट घेऊन आलेला हायवा ट्रक पलटी झाला. या अपघातात चालकाचा जीव थोडक्यात बचावला असला तरी तो गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाचे काम मुदतीत पूर्ण न होणे, वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि विभागाकडून कोणतीही ठोस भूमिका न घेणे यामुळे कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. रखडलेल्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

 

सध्या भराव खचल्यामुळे या ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद झाला असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः अवजड वाहनांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवून पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कंत्राटदाराकडून कामाचा वेग वाढवावा. तसेच पुलाच्या बांधकामातील विलंबाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. अनेक वेळा रखडलेल्या विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित झाले तरी काही लोकप्रतिनिधी प्रशासनाची बाजू घेत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

 

दरम्यान, लोढुंगवाडी साकव पुलाचे काम वेळेत पूर्ण होणार की आणखी विलंब होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या हितासाठी हे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.