फायनान्सचे अधिकारी आहे असे सांगून खंडणीची मागणी

फायनान्सचे अधिकारी आहे असे सांगून खंडणीची मागणी

चाकण - प्रतिनिधी

फायनान्सचे अधिकारी असल्याचे भासवून व बसचे तीन हप्ते थकले असल्याने दमबाजी करीत दोघांनी बस चालकाला शिवीगाळ दमबाजी केली. तसेच बस मधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून सदरची बस कडाचीवाडी ( ता. खेड)  येथे एका पार्किंग मध्ये नेऊन ठेवली. हीच बस पुन्हा घेऊन जायची असेल तर एक लाख ६२ हजार रुपयांची खंडणी मागितली. सदरची घटना चाकण मध्ये पुणे-नाशिक  महामार्गावर तळेगाव चौकात घडली आहे. 

या बाबत आशा जय मिराणी ( रा. खराडी, पुणे ) यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार अविनाश नामदेव तापकीर (रा. वडमुखवाडी, चर्होली, ता. हवेली, जि. पुणे) आणि त्याचा एक मित्र ( नाव निष्पन्न नाही ) अशा दोघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात सोमवारी (दि१३) डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा यांच्या मालकीची बस मुश्ताक हा चालवतो. काल सकाळी मुश्ताक याने बस आणली असताना अविनाश तपकीर आणि त्याचा एक मित्र दुचाकीवरून आले. 'आम्ही फायनान्सचे लोक आहोत. तुमच्या बसचे तीन हप्ते थकले आहेत' असे म्हणून बस चालकाला शिवीगाळ दमदाटी केली. त्यानंतर बसमधील प्रवाशांना दमदाटीने खाली उतरवले. बळजबरीने धमकावून बस ताब्यात घेऊन ती प्रगती पार्किंग कडाचीवाडी येथे लावली. बस सोडायची असेल तर एक लाख ६२ हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून खंडणी मागितली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे