दिलेला शब्द पाळला! कुरकुंडी, कोये व पिंपरी बुद्रुक येथील विकासकामांसाठी सुनीता बुट्टे पाटील यांच्याकडून ३० लाखांचा निधी मंजूर
कुरकुंडीतील मुकाई देवी मंदिर, पिंपरी बुद्रुकमधील संत सावता महाराज मंदिर आणि कोये येथील बहुउद्देशीय इमारतीच्या कामांसाठी प्रत्येकी १० लाखांचा निधी मंजूर; विकास सोसायटीच्या संचालकांना दिलेला शब्द पूर्ण.
महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीदरम्यान विकास सोसायटीच्या संचालकांना दिलेला शब्द पाळत, पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी कुरकुंडी, कोये आणि पिंपरी बुद्रुक या तीन गावांतील विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषद निधीतून एकूण ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मंजूर कामांच्या प्रशासकीय मान्यतेची पत्रे नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत संबंधित गावच्या ग्रामस्थांना व विकास सोसायटीच्या संचालकांना सुपूर्द करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 'अ' वर्ग सोसायटी मतदारसंघातून प्रतिनिधी निवडताना, या तिन्ही गावांतील सोसायटीच्या संचालकांनी गावातील मंदिरांच्या सभामंडपांची कामे मार्गी लावण्याची मागणी केली होती. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचा शब्द जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी त्यावेळी दिला होता. आश्वासनाची तातडीने पूर्तता करत जिल्हा परिषद सदस्या सुनीता बुट्टे पाटील यांनी आपल्या निधीतून या कामांना मंजुरी मिळवून दिली आहे.
या गावांना निधी
कुरकुंडी गावचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मुकाई देवी मंदिर सभामंडपासाठी १० लाख रुपये, पिंपरी बुद्रुक (लादवड) संत शिरोमणी सावता महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये, कोये: येथे सुरू असलेल्या मंदिर सभामंडप व बहुउद्देशीय इमारतीच्या कामासाठी १० लाख रुपये. (कोये येथील या भव्य बहुउद्देशीय इमारतीसाठी शरद बुट्टे पाटील यांनी यापूर्वीही २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, सध्या हे काम प्रगतीपथावर आहे.)
प्रशासकीय मान्यतांचे वितरण
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश राक्षे, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, आंबेठाण स्मार्ट व्हिलेजचे माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संबंधित गावातील विकास सोसायटीचे संचालक आणि ग्रामस्थांकडे या कामांच्या प्रशासकीय मान्यता सुपूर्द करण्यात आल्या.
उर्वरित कामांसाठीही निधी देणार –l
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले की, "या तिन्ही गावांतील सभामंडपांच्या उर्वरित कामांसाठी देखील आपण प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून ही सर्व कामे परिपूर्ण होतील."
दरम्यान, मागणी केल्यानंतर अत्यंत कमी कालावधीत हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कोये विकास सोसायटीच्या प्रतिनिधी जयश्री रमेशशेठ राळे, कुरकुंडी विकास सोसायटीचे प्रतिनिधी तथा सरपंच नितीन चिंधू भोकसे आणि पिंपरी बुद्रुक विकास सोसायटीचे प्रतिनिधी मच्छिंद्र भुजबळ यांच्यासह तिन्ही गावांतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत सुनीता बुट्टे पाटील व शरद बुट्टे पाटील यांचे आभार मानले आहेत.