आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायतींनी कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारावेत : गटविकास अधिकारी अजय जोशी
राजगुरूनगर : प्रतिनिधी
गावातील नागरिकांनी आपल्या घरात निघणारा ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून दारासमोर आलेल्या ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत टाकावा.कचरा वर्गीकरणामुळे ओल्या घन कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती प्रकल्प ग्रामपंचायतींनी उभारावेत,असे प्रतिपादन खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन अभियानातंर्गत सावरदरी (ता.खेड) ग्रामपंचायतीने घन कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मितीसाठी कंपोस्टिंग टाक्यांचे भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी खेड तालुका स्वच्छ भारत अभियान समन्वयक एस.डी.घाडगे,पंचायत विस्तार अधिकारी जी.पी.शिंदे,एस.डी.थोरात,सरपंच भरत तरस,उपसरपंच संदीप पवार,ग्रामपंचायत पदाधिकारी,नोहाऊ फाऊंडेशनचे विश्वस्त,ग्रामसेवक श्रीधर नाईकडे,पोलीसपाटील राहूल साकोरे,बाळासाहेब बोत्रे,उत्तम शेटे,श्रीहरी सोनवणे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
घन कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मितीसाठी १२ बाय ६ फूट आणि ३ फूट खोल अशा दोन टाक्या कंपोस्टिंग करीता उभारल्या जाणार आहेत.प्रकल्पावर १ ट्रायसिकल आणि प्लास्टिक कचरा ठेवण्याकरता लोखंडी जाळीचा १ बॉक्स आहे.गायरान जागेत उभारला जाणारा हा प्रकल्प सावरदरी गाव संपूर्ण कचरामुक्त व स्वच्छ राहण्यासाठी दिशादर्शी ठरणार आहे.सीएसआर व ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोग निधीतून प्रकल्पासाठी खर्च होणार असल्याचे ग्रामसेवक नाईकडे यांनी सांगितले.
आभार उपसरपंच संदीप पवार यांनी मानले.
