खेड सेझ क्षेत्रात खुनाची घटना,पोलीस पायबंद घालण्यात अपयशी - अशोक टाव्हरे

खेड पोलीसांचा या गंभीर घटनांवर कोणताही पायबंद नाही | शासनाने याबाबत तातडीने कारवाई करावी

खेड सेझ क्षेत्रात खुनाची घटना,पोलीस पायबंद घालण्यात अपयशी - अशोक टाव्हरे

 

राजगुरूनगर : दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी खेड सेझ क्षेत्रातील निमगाव हद्दीत कोंडीबा रामा पारधी ,वय ५० वर्षे ,यांचा खुन झाला होता .सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी उपमुख्यमंत्री, गृहसचिव,पोलीस महासंचालक,पोलीस अधिक्षक पुणे यांना निवेदन पाठवुन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.


शंकर कोंडीबा पारधी यांनी खेड पो.स्टेशनला फिर्याद दिली असून १७ ऑगस्ट रोजी दु.१२.५० वा खेड पो.स्टेशन गु.र.नं.४८६/२०२४ ,भारतीय न्याय संहिता (BNS)१०३(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आठवड्यात खेड पो.स्टेशन अंतर्गत साकुर्डी भागातही खुनाची घटना घडली आहे. खेड सेझ क्षेत्रात चार वर्षात कनेरसर येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे खुन झाले आहेत. निमगाव हद्दीत दोन वर्षापुर्वोही ठाकर समाजाच्या एका युवकाचा निर्घुण खुन झाला होता. 


चार वर्षापुर्वी तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पोलीस चौकी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. खेड सिटी इन्फ्रास्ट्रकचर कंपनीने तीन गुंठे जागा पोलीस चौकीसाठी हस्तांतरित केली आहे.मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिक्षक,पुणे यांच्याकडे प्रस्ताव प्रलंबित आहे,शासनाकडे आल्यास कार्यवाही केली जाईल असे लिखित उत्तर दिले होते.


तात्पुरती बीट चौकी करण्यासाठी कनेरसर ग्रामस्थांनी खर्च करून जागा उपलब्ध करून दिली पण दहा महिन्यात पोलीस चौकी उभारली नाही. सदरची जागा मालकाने त्यांच्या व्यावसायिक कारणांसाठी जागा परत मागितली आहे.पोलीसांना चौकी सुरू करायचीच असेल तर खेड सिटीकडून पर्यायी जागा घेऊन तातडीने सुरू करू शकतात,परंतु सेझ क्षेत्रात वाढती कामगारसंख्या यामुळे अवैध दारू व इतर धंदे मोठया प्रमाणात फोफावले आहे,त्यातून पोलीस चौकी अधिकारी वर्गाला नको आहे असा आरोप  टाव्हरे यांनी निवेदनात केला आहे.


दोन दिवसांपुर्वी निमगाव हद्दीत ठाकर समाजातील कोंडीबा पारधी यांचा खुन झाला.दारू पिऊन झालेल्या वादातून खुन झाला असावा अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.ठेकेदारीतून स्पर्धा,त्यातून भांडणे,मारामारी नित्याचीच झाली आहे.

 

खेड पोलीसांचा या गंभीर घटनांवर कोणताही पायबंद नाही.शासनाने याबाबत तातडीने कारवाई करावी.खुनासारख्या गंभीर घटना वारंवार घडुनही पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात आहे ही खेदाची बाब असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले आहे.