राजगुरूनगर व मोशी टोलनाका मुदत ८ ऑक्टोबरला समाप्त.नाशिकफाटा ते राजगुरूनगर राष्टीय महामार्ग समस्यांच्या विळख्यात.

महावार्ता लाईव्ह
----------------------------
राजगुरूनगर :प्रतिनिधी
नाशिकफाटा ते राजगुरूनगर (चांडोली) या दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.या महामार्गाच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचले असून रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे.दुभाजकावरील प्रकाशरोधक फलक (रिफ्लेक्टर) तुटलेत,तर महामार्गाच्या दोन्ही साइडपट्ट्यांच्या जागेत गवतासह लहान मोठी झाडे उगवली आहेत.महामार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक व दुचाकीस्वरांना स्वच्छतागृह वा अन्य सुविधाही उपलब्ध नाहीत.नाशिकफाटा ते चांडोली या महामार्गावरील मोशी व चांडोली या दोन्ही टोलनाक्याची मुदत येत्या ८ ऑक्टोबर २०२१ रोजी समाप्त होत आहे.
पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकफाटा ते राजगुरूनगर (चांडोली) या दरम्यान ३० किलोमीटरचा महामार्ग बांधा,वापरा व हस्तातरण करा या धर्तीवर केंद्र व राज्य सरकारने ए.टी.आर.इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला २५ ऑगस्ट २००३ साली मंजुरी देण्यात आली.त्यानंतर सदर कंपनीने २ वर्षाच्या कालखंडात अरुंद दोन मार्गाच्या रस्त्याचे रूपांतर चार मार्गात करून महामार्ग डांबरीकरणाने गुळगुळीत केला.भोसरी व चाकण येथे उड्डाणपूलाची उभारणी केली,परंतु चाकण येथील दोन्हीही उड्डाणपूल चुकीच्या ठिकाणी उभारल्याने फसले आहेत. असून अडचण नसून फायदा अशी उड्डाणपूलाची स्थिती बिकट आहे.त्या काळच्या राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार केले,पण ते आज अडचणींचे ठरले आहेत.
बांधा,वापरा आणि हस्तांतरण करा धर्तीवर ए.टी.आर. कंपनीने नाशिकफाटा ते राजगुरूनगर (चांडोली) या दरम्यान महामार्गाचे काम पूर्ण केल्याच्या बदल्यात कंपनीला मोशी व चांडोली येथे टोल नाका उभारून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकडून टोल आकारणी (पैसे) वसूल करण्यास १५ वर्षाच्या कालखंडासाठी १५ डिसेंबर २००५ पासून परवानगी देण्यात आली.कंपनीला देण्यात आलेली १५ वर्षाची मुदत मागील महिन्याच्या १४ सप्टेंबर २०२१ ला समाप्त झाली होती,परंतु २४ दिवसांची वाढीव मुदत ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत दिल्याने चांडोली व मोशी येथे वाहन चालकांना अजून ८ दिवस म्हणजेच १ आठवडा टोल द्यावा लागणार आहे.
ज्या टोलनाक्यांची मुदत संपली आहे,त्यांना पुन्हा टोल वसूल करण्यास मुदतवाढ देणार नसल्याची घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच केली आहे.त्यामुळे मोशी व चांडोली येथील टोलनाका बंद होण्याची शक्यता आहे.१५ वर्षाच्या कालखंडात एटीआर कंपनीने टोल आकारल्याने त्यांनाही नफाच झाला.
सध्या नाशिकफाटा ते राजगुरूनगर (चांडोली) या महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचल्याने त्यातून दुर्गंधी सुटत आहे.वाहनांच्या धडकेने मेलेली कुत्री महामार्गावर पडून असतात.महामार्गाच्या मध्यभागी दुभाजकावर असलेले प्रकाशरोधक फलक अनेक ठिकाणी तुटल्याने रात्रीच्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईट विरुद्ध दिशेने जाणाऱ्या चालकांच्या डोळ्यात उतरतात,त्यामुळे चालकांला दिसत नाही व परीणामी अपघात घडतात.तसेच टोलनाका चांडोली,भाम, चाकण उड्डाणपूल,चिंबळी,भोसरी आदी ठिकाणीच्या महामार्गावर पाणी साचत आहे.वाहन चालक व प्रवाशी यांचेसाठी टोलनाका या ठिकाणी सुराज्य असे स्वच्छतागृह कुठे उभारले आहे ते दिसत नाही.अपघात झाल्यावर रुग्णास दवाखान्यात न्यायला अंबुलन्स नाही.अशा अनेक प्रकारच्या सुविधाही निर्माण केल्या नाहीत.त्यामुळे अवघ्या आठ दिवसाची डेडलाईन असलेले मोशी व चांडोली टोलनाका बंद होणार आहेत.
----------------------------------------