Khed | धामणे जि.प शाळेचा वेदांत बारवेकर झाला मुख्यमंत्री

निवडणूक प्रक्रियेचे संयोजन मुख्याद्यापक धर्मराज पवळे यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षक अमर केदारी,मंगल निमसे- पिंगळे,गोरख नवले यांनी केले

Khed | धामणे जि.प शाळेचा वेदांत बारवेकर झाला मुख्यमंत्री

चाकण : धामणे (ता.खेड) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया हा उपक्रम प्रत्यक्षात मतदान घेऊन राबविण्यात आला.या उपक्रमामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्र कृतियुक्त अभ्यासास मदत होऊन निवडणूक प्रक्रिया कशी राबविली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.धामणे जिल्हा परिषद शाळेत झालेल्या निवडणुकीत वेदांत बारवेकर विजयी होऊन मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला.

 

शाळेत मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी शिक्षकांनी वेगळी कल्पना लढवून आणि विद्यार्थ्यांना निवडणूक कशी असते याची माहिती व्हावी या दृष्टीने निवडणूक घेण्यात आली.निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाला. उमेदवारी अर्ज भरणे,माघार घेणे,प्रचार सभा,आदर्श आचारसंहिता पालन,मतदान अधिकारी नियुक्ती,मतदारांचे ओळख पुरावा,बोटाला शाई लावणे,मोबाईल अँपवरील  ई.व्हि.एम.मशीनवर गुप्त मतदान प्रक्रिया,प्रतिनीधी समक्ष मतमोजणी आणि निकाल जाहिर करणे या सार्‍या बाबींचा प्रत्यक्ष  कृतियुक्त अनुभव विद्यार्थ्यांना यावेळी आला.

 

मुख्यमंत्री पदासाठी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादित चमकलेले विद्यार्थी वेदांत विलास बारवेकर (इ.७वी),आयुष दत्तात्रय कोळेकर (इ.६ वी) आणि हर्षाली किरण कोळेकर (इ.७वी) यांच्यामध्ये लढत झाली.मतदानाच्या दिवशी प्रारंभीच हर्षाली कोळेकरने आपली अनौपचारीक माघार जाहिर करुन आपल्या वर्गातील वेदांत बारवेकरला पाठींबा जाहिर केला.मुख्यमंत्री पदासाठी झालेल्या एकूण ९३ मतदानापैकी ५२ मते वेदांतला व ३६ मते आयुषला आणि ४ मते हर्षालीला आणि १ मत नोटाला पडले.वेदांत बारवेकर बहुमताने निवडून आल्याने मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला.मतदान अधिकार्‍यांच्या निर्णयानुसार दुसर्‍या क्रमांकाची मते मिळालेला आयुष कोळेकरला उपमुख्यमंत्री म्हणून जाहिर करण्यात आले.

 

मुख्यमंत्री बारवेकर यांनी आपल्या मंत्रिमंडळात

 

हर्षाली कोळेकर (सांस्कृतिक मंत्री), दिव्या बाबाजी सातपुते - (आरोग्यमंत्री), राज अर्जुन चव्हाण - (पोषण आहार मंत्री), समिक्षा सतीश गिर्‍हे - (क्रिडा मंत्री), समृद्धी काळूराम कोळेकर - (ग्रंथालय मंत्री), विश्वराज समाधान कोळेकर - (उद्यान मंत्री) वैभवी शिवाजी कोळेकर - (परिपाठ मंत्री), शिवम विशाल कावळे - (सहल व उपक्रम मंत्री) वरील सर्वांना संधी दिली.

 

संपुर्ण निवडणूक प्रक्रियेचे संयोजन मुख्याद्यापक धर्मराज पवळे यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षक अमर केदारी,मंगल निमसे- पिंगळे,गोरख नवले यांनी  केले.नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाचा सन्मान मुख्याध्यापक पवळे यांच्या हस्ते झाला.प्रत्येक मंत्र्याचे अधिकार व कर्तव्य या बाबतच्या सूचना अमर केदारी यांनी मंत्री महोदय विद्यार्थ्यांना यावेळी दिल्या.