खेड तालुक्यातील १०१ पोलीस पाटलांना मुदतवाढ
१०१ जणांना दहा वर्ष पुन्हा संधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील १०१ पोलीसपाटलांना १० वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.एकाचवेळी पोलीसपाटलांना मुदतवाढ दिल्याचे लेखी आदेश मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.
खेडचे प्रांताधिकारी यांचे कार्यालयात शुक्रवार (दि.६) रोजी १०१ पोलीसपाटील यांना १० वर्षासाठी मुदतवाढीचे लेखी आदेश प्रांताधिकारी चव्हाण यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार संतोष चव्हाण,महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब शिंदे,पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा तृप्ती मांडेकर,प्रांत कार्यालयातील अव्वल कारखून अविनाश कुलकणी,महसूल सहाय्यक गणेश डुबे आदी उपस्थित होते.एकाचवेळी १०१ पोलीसपाटलांना पदाची मुदतवाढ देण्यात आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
खेड तालुक्यात एकूण १८६ पोलीसपाटील पदे असून त्यापैकी १५१ पदे भरली आहेत.तर ३५ पोलीसपाटील पदे तालुक्यात रिक्त आहेत.३१ डिसेंबर २०२२ रोजी पोलीसपाटील पदाला ५ वर्ष पूर्ण झाल्याने १०३ पोलीस पाटलांनी मुदतवाढीसाठी अर्ज केले होते.त्यापैकी (दि.६) रोजी १०१ जणांना लेखी आदेशाने मुदतवाढ देण्यात आली.उर्वरित राहिलेल्या पोलीसपाटलांना पुढच्या टप्प्यात मुदतवाढ देण्यात येणार आहे.
मुदतवाढीचे लेखी आदेश दिलेल्या सर्व १०१ पोलीस पाटलांचे पोलीस अधीक्षक,पोलीस निरीक्षक यांचे दाखले व शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे प्रमाणपत्र आदींची तपासणी करण्यात आली.पुढील ३१ डिसेंबर २०३२ पर्यंत मुदतवाढ दिल्याचे प्रांताधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
