Khed gramin crime | कारकुडीत पुतण्याचाच काकाच्या घरावर डल्ला! १ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास

शेतात कामासाठी गेलेल्या काकाच्या बंद घराचे कुलूप तोडल्याची घटना; सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम चोरीला, घरातील टीव्ही आणि मिक्सरचे नुकसान

Khed gramin crime | कारकुडीत पुतण्याचाच काकाच्या घरावर डल्ला! १ लाख २५ हजारांचा ऐवज लंपास

 

महावार्ता लाईव्ह | शेतात कामासाठी गेलेल्या काकाच्या बंद घराचे कुलूप तोडून सख्ख्या पुतण्यानेच घरातील सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना खेड तालुक्यातील कारकुडी येथे उघडकीस आली आहे. केवळ चोरीवरच न थांबता या पुतण्याने घरातील टीव्ही आणि मिक्सरची तोडफोड करून नुकसान केल्याचेही समोर आले आहे.

 

याप्रकरणी काका सुरेश गोविंद भोजणे (वय ६५, रा. कारकुडी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुतण्या संदीप रमेश भोजणे (रा. कारकुडी, ता. खेड) याच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश भोजणे हे शुक्रवारी (दि.२३) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसल्याची संधी साधत पुतण्या संदीप भोजणे याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा व कुलूप कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.

 

घरातून शोधाशोध आणि वस्तूंच्या आदळआपटीचा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या फिर्यादींच्या चुलत सून शकुंतला यांचे तिकडे लक्ष गेले. संदीप घरातून बाहेर येत असताना शकुंतला यांनी त्याला "तू इथे काय करतोस?" अशी विचारणा केली असता, त्याने कोणतेही उत्तर न देता तिथून धूम ठोकली.

 

सुरेश भोजणे शेतातून घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले व चुलत सुनेकडून घडलेला सर्व प्रकार समजला. त्यांनी तातडीने घरात जाऊन पाहणी केली असता, पहिल्या खोलीतील लाकडी कपाटाचा दरवाजा तोडलेला होता आणि घरातील सर्व भांडी व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच घरातील टीव्ही आणि मिक्सर फोडून त्याचे मोठे नुकसान करण्यात आले होते.

 

पुतण्याने कपाटात ठेवलेले ७५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) खेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.