Young man consumes poison | राजगुरूनगर पोलिस ठाण्यात चौकशी दरम्यान तरुणाचे विषप्राशन; खेड तालुक्यात उडाली खळबळ
अल्पवयीन मुलीचे बेपत्ता प्रकरणात तरुणाची चौकशी सुरू असताना त्याने उचलले टोकाचे पाऊल; राजगुरूनगर नंतर उपचारासाठी तातडीने पुण्यातील रुग्णालयात दाखल
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील राजगुरूनगर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या एका तरुणाने विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली.या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचे बेपत्ता प्रकरणातील चौकशी सुरू असतानाच संबंधित तरुणाने विषप्राशान करून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती चौकशीनुसार समोर आली आहे.
मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याबाबत राजगुरूनगर येथील राहणाऱ्या मुलीचे नातेवाईकांनी नऊ दिवसांपूर्वी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्ह्य दाखल केला आहे. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विजय लोखंडे (रा. कन्हेरसर, ता.खेड व सध्या राहणार वडगादी चौक, राजगुरूनगर) याला चौकशीसाठी राजगुरूनगर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये त्याची तपासी पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असताना चौकशीच्या भीतीने त्याने जवळ आणलेले विषारी द्रव्य प्राशन केले.
विषप्राशन केल्यानंतर विजय लोखंडे याला राजगुरूनगर येथील गावडे हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केले. परंतु त्याची प्रकृती बिघडू लागल्याने पुढील वैद्यकीय उपचारासाठी पोलिसांनी तातडीने पुणे येथे त्याला हलविले आहे.त्याच्यावर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
ही घटना पोलिस ठाण्यात घडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. संबंधित तरुणाने विषारी पदार्थ पोलिस ठाण्यात कसा आणला, त्यामागील नेमके कारण काय होते आणि घटनेच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास देखील पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत राजगुरूनगर पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळणे अपेक्षित असून, तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल.
तरुणाने विष प्राशन केल्याची घटना घडतात उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे व राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी गावडे हॉस्पिटल येथे भेट देऊन तरुणाच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून विचारपूस केली. संबंधित तरुणाला वाचविण्याचे डॉक्टरांचे मोठे प्रयत्न सुरू आहेत.