राजगुरूनगर नगरपरिषदची प्रभाग रचना जाहीर

राजगुरूनगर नगरपरिषदची प्रभाग रचना जाहीर

राजगुरूनगर : न्यूज नेटवर्क 

राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने गुरुवारी (दि. १०) प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता राजगुरूनगर शहरात निवडणुकीचे रंग भरू लागले असून, इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

राजगुरुनगर नगरपरिषदेची १५ मे २०२० रोजी मुदत संपली. त्यानंतर नगरपरिषदेत खेडचे उपविभागीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. सन २०२० ते मार्च २०२२ या कालावधीतील मुदत संपलेल्या तसेच मुदत संपत आलेल्या नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका द्विसदस्यीय रचना केली आहे. त्यानुसार निवडणुका घेतल्या जाणार आहेत. आता राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या काही कालावधीत होणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

राजगुरुनगर नगरपरिषदेत यापूर्वी नऊ प्रभाग होते. त्यामध्ये आता आणखी एका प्रभागाची भर पडली आहे. त्याशिवाय प्रभाग क्रमांक सात मध्ये तीन जागा आहेत. त्यामुळे आता २१ सदस्य आणि २ स्वीकृत सदस्य अशी सदस्य संख्या असेन, असे नगरपरिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एकूण दोन सदस्यांसाठी राखीव जागा असून, एससीचे व एसटीचे प्रत्येकी एक आरक्षण असणार आहे. एकूण २१ पैकी ११ जागा महिला राखीव असणार आहेत, उर्वरित १० जागांवर आहेत.

आता इच्छुकांची संख्या वाढली असून, नातलग, सगेसोयरे, मित्रपरिवार यांच्याकडे हेलपाटे सुरू झाले आहेत. यंदा राजगुरुनगर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रंगत येणार असून, इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. जुन्या नगरसेवकांना लोक नाकारता का नवीन तरुणांना संधी मिळते, हे पुढील काळात लवकरच स्पष्ट होणार आहेत.

राजगुरुनगर नगरपरिषदेवर महिलाराज येणार आहे. २१ पैकी ११ महिला सदस्या तसेच मुख्याधिकारी यांच्यासह स्वच्छता अभियंता, कर निरीक्षक, भांडार विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभागप्रमुख, प्रधानमंत्री घरकुल विभागप्रमुख, विद्युत पुरवठा विभागप्रमुख व संगणक अभियंता देखील महिलाच आहेत. ही प्रभागरचना www.mahadma.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही प्रभागरचना २०११ च्या जनगणनेनुसार तयार केली आहे. एकूण मतदारसंख्या २८ हजार ५९२ आहे. यापैकी अनुसूचित जमातीचे १७६९, तर अनुसूचित जातीचे १४२५ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ७ ‘गेम चेंजर’ असून, त्यामधून ३ नगरसदस्य निवडून जाणार आहेत.

----------------------------------------------------------------------