दारू पिण्यास पैसे न दिल्याने खून ; खेड पोलिसांची कामगिरी ८ तासात गुन्ह्याचा उलगडा
खेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ८ तासात आरोपीस अटक केली.
राजगुरूनगर - प्रतिनिधी
खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रक हद्दीत हॉटेल माथेरान गारवा या ठिकाणी एका तरुणाची निघृणपणे हत्या करण्यात आली व एक जण गंभीर जखमी असून तो औषधउपचार घेत आहे.
दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणावरून रामदास सोपान थिटे (वय २७, रा. सडकवस्ती रेटवडी ता खेड ) या युवकाचा लाकडाने गंभीर मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. तसेच या घटनेत एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री ( दि १५ ) घडली. गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी अवघ्या ८ तासात आरोपीस अटक करून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर गुन्हा दाखल झालेनंतर सदर गुन्हयाचा तपास पुढे सुरू केला असता खेड पोलीस स्टेशनमधील पोलीस अंमलदारांचे दोन पथके तयार करून आरोपीचा शोध घेणे बाबत सुचना वरीष्ठांनी दिल्या त्यानूसार तपास पथकास मिळालेल्या बातमीच्या आधारे तपास केला असता असे निष्पन्न झाले की, सदरचा गुन्हा आरोपी नितीन काळूराम काशिद ( वय ४७ वर्षे रा. खरपुडी बुद्रुक ता. खेड जि. पुणे ) याने केला असल्याचे माहीती मिळाल्याने त्याचा शोध घेतला असता तो घरातून फोन बंद करून फरार झाले असल्याचे समजले. त्याचा आजूबाजूचे गावामध्ये शोध घेत असताना सदरचा इसम हा खेड घाट परीसरात पळून जात असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले व त्याचेकडे सदर गुन्हया बाबत तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबूली दिली. आरोपी काशिद याने मयत व जखमी इसमांना दारू पिणेसाठी पैसे मागतिले होते ते मयत व जखमी यांनी त्यास न दिल्याने व त्यास शिवीगाळ केल्याने त्याचा राग मनात धरून काशिद याने लाकडी दांडके डोक्यात प्रहार करून थिटे याचा खून केला व दत्तात्रय टाकळकर यास गंभीर जखमी केले.
खेड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार मोहन अवघडे, संतोष घोलप, शंकर भवारी, सचिन गिलबीले, विजय रहातेकर, बाळकृष्ण साबळे, बाळकृष्ण भोईर, शेखर भोईर, प्रविण गैंगजे, निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, विशाल कोठावळे, स्वप्नील लोहार, रमेश दाते चालक रमेश करंडे, संजय रेपाळे यांनी तपास केला असून ८ तासात आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
----------------------------------------------------------------
