Shiroli Safe Childhood Campaign | शिरोलीत सुरक्षित बालपण अभियानांतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
बालहक्क, POCSO कायदा, सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
महावार्ता लाईव्ह | सुरक्षित बालपण अभियानांतर्गत शिरोली (ता. खेड) येथील जिल्हा परिषद शाळेत कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थी केंद्राच्या निर्देशानुसार खेड विधी सेवा समिती, खेड वकील संघटना आणि राजगुरूनगर येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराच्या माध्यमातून बालकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, त्यांच्यावरील अत्याचार रोखणे, तसेच सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड सत्र न्यायालयाचे वरिष्ठ स्तर द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश एम. टी. खराडे उपस्थित होते. याप्रसंगी खेड वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. अतुल तानाजी गोरडे, वकील संघटनेचे पदाधिकारी, तालुका विधी सेवा समिती प्रियांका कदम, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण शिंदे, महाविद्यालयाच्या मोफत विधी सहाय्य विभागाचे समन्वयक प्रा. संदीप तायडे, प्रा. ज्योती सांडभोर, प्रा. विनय राऊत यांच्यासह विधी शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात बालकांचे अधिकार, वैयक्तिक सुरक्षितता, ऑनलाइन सुरक्षितता, तक्रार व अहवाल नोंदविण्याची यंत्रणा, बालसुरक्षा, सायबर सुरक्षा आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ॲड. कावेरी गुंजाळ यांनी बालकांचे अधिकार, वैयक्तिक सुरक्षितता, ऑनलाइन सुरक्षितता व तक्रार नोंदविण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. ॲड. गोपाळ शिंदे यांनी बालसुरक्षा व सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली, तर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी दिया जाधव यांनी POCSO कायद्याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. अतुल गोरडे यांनी केले. सूत्रसंचालन महाविद्यालयाचा विद्यार्थी पूर्वा भोकसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ओम चौधरी यांनी केले.