वराळे, शिंदे, भांबोली गावांना जागा देण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश

शरद बुट्टेपाटील : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा

वराळे, शिंदे, भांबोली गावांना जागा देण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या टप्पा क्रमांक दोन मधील वराळे,भांबोली आणि शिंदे या तीन ग्रामपंचायतींनी गावच्या सार्वजनिक कामासाठी एमआयडीसीकडे मागणी केलेल्या जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंत्रालयात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचेबरोबर सोमवारी (दि.९) सकारात्मक बैठक संपन्न झाली.बैठकीत जागेची मागणी केल्यानंतर याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मंत्रीमहोदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.अशी माहिती जि.प.चे माजी सभापती व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी दिली.

मंत्रालय मुंबई येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर विशेष बैठकीचे आयोजन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मागणीवरून करण्यात आले होते.आढळराव यांनी अनेक वर्षाची मागणी प्रलंबित असल्याने आपण तातडीने हा विषय मार्गी लावावा या विषयी लेखी पत्र मंत्री सामंत यांना दिले होते.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या टप्पा क्रमांक दोन मधील वराळे,भांबोली,शिंदे या तीन ग्रामपंचायतींनी क्रीडांगण,शाळा,वीज,पाणी,स्मशानभूमी,गार्डन आदी सार्वजनिक व इतर भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी जागेची मागणी यापूर्वी प्रस्ताव देऊन एमआयडीसीकडे केली आहे

.मागणी करूनही अद्याप जागा ग्रामपंचायतीला मिळाली नाही म्हणून मागणी केलेल्या जागा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंत्रीमहोदय यांचेबरोबर बैठकीत आयोजित केली होती. तातडीने जागेसंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी बैठकीतील अधिकाऱ्यांना दिले.यावेळी एमआयडीसी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,प्रादेशिक अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.माजीमंत्री बाळा भेगडे यांचेही बैठकीसाठी सहकार्य मिळाले.

आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शरद बुट्टे पाटील,काळुराम पिंजण सुनील देवकर,दत्तात्रय टेमगिरे यांनी मंत्रीमहोदय यांच्यापुढे आपले जागेसंदर्भातील विषय सविस्तरपणे आणि मुद्देसूद मांडले.उद्योगमंत्री यांचे बरोबर सकारात्मक बैठक झाल्याने वरील गावांना लवकरच सार्वजनिक कामांसाठी जागा निश्चितपणे मिळण्याची आशा  निर्माण झाली आहे.