Khed Aalandi Vidhansabha | प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; दोन दिवस निर्णायक..?

विजयासाठी कोण काय,कसे गणित जुळविणार,मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता | तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार..?

Khed Aalandi Vidhansabha | प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; दोन दिवस निर्णायक..?

 

महावार्ता लाईव्ह | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसापासून घमासान सुरू असताना प्रचाराची अखेर आज सायंकाळी ६ वाजता सांगता झाली. जाहिर सभा, प्रचार रॅली तसेच पत्रकार परिषदांच्या माध्यमातून होत असलेल्या आरोप, प्रत्यारोपांसह आश्वासनांनी धडाडणाऱ्या प्रचार तोफा अखेर थंडावल्या. मतदान गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी होत असून तोपर्यंत आता गुप्त बैठका, राजकीय डावपेच रंगणार आहेत.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी सहा वाजलेपासून जाहीर प्रचार बंद झाला असला तरी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेणे तसेच मतदारांना स्लीपांचे वाटप करणे तसेच गुप्त बैठकांचे सत्रही याच काळात होणार आहे.येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदानापूर्वीचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत.निवडणूक विभाग,पोलिस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती भरारी पथके अधिक सक्रिय असून उमेदवार,राजकीय पक्ष,नेते,कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालीवरही त्यांची नजर राहणार आहे.त्यापूर्वी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात येणार आहेत.

 

यावेळच्या निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचार करताना हायटेक प्रचार यंत्रणेचा उपयोग केला गेला आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून हायटेक प्रचार यंत्रणा वापरण्यात आली.डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून उमेदवारांनी आपले व्हिजन जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले.त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा देखील प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

 

आता जाहीर प्रचार संपला असून २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. खेड - आळंदी विधानसभा मतदारसंघात ३८९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल राजगुरूनगर येथे पार पडेल. मतदारसंघात ३ लाख ७६ हजार ६२३ मतदार आहेत. यात महिला १ लाख ९३ हजार ७१९ व १ लाख ८२ हजार ८९२ पुरूष मतदार आहेत.

 

खेड - आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात असून महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्यात प्रामुख्याने मुख्य अशी तुल्यबळ लढत होणार आहे.अन्य ११ उमेदवार रिंगणार आहे.त्यामुळे विधानसभेच्या या रिंगणात मोहिते पाटील चौकार मारतात का तसेच शिवसेनेचे बाबाजी काळे हे खेड तालुक्यात भगवा फडकणार का याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

इथे शोधा मतदानाचे ठिकाण

आपल्या मतदान केंद्राचे ठिकाण शोधण्यासाठी मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.