चांडोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आरती डोळस तर उपसरपंचपदी रुपेश ताये

राजगुरूनगर : न्यूज नेटवर्क
खेड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या चांडोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.आरती किशोर डोळस यांची बहुमताने निवड झाली.तर उपसरपंचपदी रुपेश बाळासाहेब ताये यांची निवड बिनविरोध झाली.निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांची गावातून मिरवणूक काढून गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण करण्यात आली.
ठरल्याप्रमाणे मुदत संपताच सुनीता नवनाथ सावंत यांनी सरपंचपदाचा तर दत्ताशेठ (चिकाभाऊ) वाघमारे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त दोन्ही पदांची निवडणूक कडूस विभागाच्या मंडलाधिकारी एस.जी.विटे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली.निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक निलेश पांडे यांनी पाहिले.कामकाजात तलाठी व्ही.टी.यांनी मदत केली.
सरपंचपदासाठी आरती डोळस व स्वाती बाळासाहेब वाघमारे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.उपसरपंच पदाकरिता रुपेश ताये यांचेच नामनिर्देशनपत्र दाखल झाले. सरपंचपदाची निवडणूक डोळस व वाघमारे यांच्यात होऊन डोळस यांना ७ तर वाघमारे याना केवळ ३ मते पडली. डोळस यांची बहुमताने सरपंचपदी निवड झाली.तसेच ताये यांचाच एकमेव अर्ज असल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.चांडोली ग्रामपंचायतीचे एकूण ११ सदस्य असून १० सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
ग्रामपंचायतीवर मावळते उपसरपंच चिकाशेठ वाघमारे यांचे वर्चस्व आहे.निवडणूक प्रसंगी सभागृहात नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच यांचेसह मावळत्या सरपंच सुनीता सावंत, ग्रामपंचायत सदस्य सतीश मोहन सावंत,सचिन वाघमारे, सतीश शंकर सावंत,सुनीता चेतन सावंत,प्रिया पवळे,स्वाती वाघमारे,अंजना वाघमारे हे सदस्य उपस्थित होते.निवडणूक शांततेत पार पडली.निवडणूक प्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------