वराळे येथील लर्निंग ट्री शाळेत भरला आठवडे बाजार
बाजारातील वस्तू खरेदी करण्यासाठी गावातील व्यक्ती तसेच पालकांनी मोठी गर्दी केली
लर्निंग ट्री शाळेत भरलेला आठवडे बाजार
राजगुरुनगर : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान व कौशल्य विकसित व्हावे या हेतूने वराळे (ता.खेड) येथील लर्निग ट्री इंग्लिश मीडियम शाळेत आठवडे बाजार भरला.बाजारात विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला खरेदी करण्यासाठी पालक व गावातील नागरिकांनी गर्दी केली होती.
शाळेच्या क्रीडा मैदानावर आठवडे बाजार भरवण्यात आला होता.यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शेतात पीकविलेला भाजीपाला,विविध खाद्यपदार्थ,रोजच्या वापरातील अनेक प्रकारच्या वस्तूसह किराणामाल विक्रीसाठी बाजारात घेऊन बसली होती.आठवडे बाजार या उपक्रमात शाळेमधील पहीली ते सातवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.बाजारातील वस्तू खरेदी करण्यासाठी गावातील व्यक्ती तसेच पालकांनी मोठी गर्दी करीत विद्यार्थ्यांकडून अनेक वस्तू खरेदी केल्या.भाजीपाला व अनेक वस्तू विक्रीतून विद्यार्थ्यांना चांगला नफा झाला.विद्यार्थ्यांच्या बाजारात देखील नागरिकांनी घासाघिस करून भाजीपाला व वस्तू खरेदी केल्या.किलो,अर्धाकिलो व पावशेर या वजन मापात भाजीपाला व वस्तू मोजून देताना विद्यार्थी आनंदी होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बुट्टेपाटील,गावच्या सरपंच पुजा बुट्टेपाटील,पालक संघाचे अध्यक्ष सुनील देवकर यांनी उपस्थित राहून आठवडे बाजारात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.शाळेतील सर्व शिक्षकांनी आठवडे बाजार यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
