Kundeshwar accident | पापळवाडीवरचे दुःखाचे सावट थांबेना ; अपघाताच्या पाचव्या दिवशी बारावा बळी
खेड तालुक्यातील पाईट येथील कुंडेश्वर डोंगरावरील भीषण अपघातात आणखी एक बळी ; मृतांची संख्या १२ ; लक्ष्मीबाई कोळेकर यांचे निधन
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील पाईट गावाजवळील श्रीक्षेत्र कुंडेश्वर डोंगरावर (दि.११ऑगस्ट) घडलेल्या भीषण पिकअप अपघातात जखमी झालेल्या लक्ष्मीबाई हरिश्चंद्र कोळेकर यांचे उपचार दरम्यान अपघाताच्या पाचव्या दिवशी (दि.१५) मोशी येथील साईनाथ हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाले. कालच सुलाबाई बाळू चोरघे यांचे चौथ्या दिवशी (दि.१४) पिंपरी येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे उपचार दरम्यान दुःखद निधनाने झाले. लक्ष्मीबाई कोळेकर व सुलाबाई चोरघे यांच्या निधनाने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताने संपूर्ण पाईट गावावर शोककळा पसरली.
खेड तालुक्यातील पाईट येथील श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे भगवान महादेवाच्या दर्शनासाठी काळूबाई बचत गटातील महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी कुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर चढत असताना पुढे न गेल्याने मागे येत सुमारे १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एकूण १० महिलांचा मृत्यू झाला, तर २९ महिला जखमी झाल्या होत्या. या अपघातात जखमी झालेल्या लक्ष्मीबाई कोळेकर यांच्यावर मोशी येथील साईनाथ हॉस्पिटल व सुलभाबाई चोरघे यांच्यावर पिंपरी येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही, आणि आज त्यांचे निधन झाले.
आज एका छोट्या मुलीला उपचारकरून केअरवेल हॉस्पिटल चाकणमधून घरी सोडण्यात आले. यापूर्वी पोखरकर हॉस्पिटल राजगुरूनगर मधून दोन महिला पेशंट घरी सोडण्यात आले आहे. आता सध्या राजगुरुनगर येथे बांबळे हॉस्पिटल मध्ये ३, गावडे हॉस्पिटल मध्ये २, शिवतीर्थ हॉस्पिटलमध्ये ६, साळुंखे हॉस्पिटलमध्ये ४ तर साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे ७ असे एकूण २२ पेशंट उपचार घेत आहेत.
या अपघाताप्रकरणी महाळुंगे पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. पिकअप गाडीच्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला की चालकाच्या निष्काळजीपणामुळे, याचा शोध घेतला जात आहे.
