उघड्यावर कचरा टाकणाऱ्यास हजारांचा दंड ; फोटो काढणाऱ्यास पाचशे रुपये बक्षिस

खेड तालुक्यातील राक्षेवाडी ग्रामपंचायतीचा निर्णय

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यास हजारांचा दंड ; फोटो काढणाऱ्यास पाचशे रुपये बक्षिस

राजगुरूनगर : राक्षेवाडी (ता.खेड) गावच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला कोणीही येऊन कचरा टाकतात.यावर उपाय म्हणून राक्षेवाडी ग्रामपंचायतीने रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्याकडून १ हजार रूपये दंड आकाराला जात असून कचरा टाकणाऱ्याचे फोटो काढणाऱ्याला पाचशे रुपये बक्षीस देऊन सत्कार केला जाणार आहे.दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याने ग्रामपंचायत आता एक्शन मोडवर आली आहे.

 

राक्षेवाडी हे गाव राजगुरूनगर शहरालगत असून येथे राहणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतीकडून सर्व सुविधा पुरविल्या जातात.त्यामुळे गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरीकरण दिवसेंदिवस वाढत आहे.कंपनीत काम करणारे कामगार मोठ्या प्रमाणात राहत आहेत.गावच्या हद्दीतील गृहप्रकल्प,घरांच्या चाळी,बिल्डिंग,नागरिकांच्या घरातून निघणारा कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची घंटागाडी घरासमोर दररोज येऊन ओला व सुका कचरा संकलित केला जातो.ग्रामपंचायत प्रशासनाने गाडीवर लाऊडस्पीकर जाऊन रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नये असे आवाहन दररोज केले जात आहे.प्रामाणिक नागरिक मात्र दररोज येणाऱ्या घंटागाडीत कचरा टाकतात.काही नागरिक येणाऱ्या गाडीत कचरा न टाकता सकाळी किंवा रात्री रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात ही बाब अतिशय चुकीची ठरत आहे.ग्रामपंचायतीने जागोजागी कचरा टाकू नये आणि टाकणाऱ्याला दंड व टाकणाऱ्याचे फोटो आणि शूटिंग काढणाऱ्याला बक्षीस याबाबत जनजागृती करण्यासाठी फ्लेफ लावले आहेत.

 

कामगार सकाळी कार किंवा दुचाकीवरून जाताना आपल्या बरोबर प्लॅस्टिक पिशवीत भरून आणलेला कचरा रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे टाकतात.रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याचे दिसताच दुसरे लगेच त्याच ठिकाणी कचरा पिशव्या टाकून परिसराचा भाग उकिरडा बनविला जातो आणि हे विद्रुप दिसणारे चित्र योग्य नाही. कचऱ्यावर भटकी कुत्री व डुकरे खाण्यासाठी काहीतरी मिळावे म्हणून प्लॅस्टिक पिशव्या फोडतात.त्यामुळे कचरा परिसरात अस्ताव्यस्त पडतो व दुर्गंधी देखील पसरत आहे.

 

रस्त्याच्या कडेला कचरा टाकणे बंद व्हावे म्हणून यावर उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने चांगली युक्ती शोधून कचरा टाकणाऱ्याला १ हजार दंड तर कचरा टाकणाऱ्याचे फोटो काढणाऱ्याला पाचशे रुपये बक्षीस आणि सत्कार ही कल्पना सध्यातरी फायदेशीर ठरणार आहे.तसेच कचरा टाकणाऱ्याला प्रसाद देखील मिळत असल्याने प्रसादामुळे कोणीही नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नसल्याची दक्षता घेण्याची गरज आहे.

राक्षेवाडी गावात राहणाऱ्या नागरिकांना मुबलक पाणी, रस्त्याला पथदिवे,परिसरात रस्त्याचे जाळे,गटर सुविधा, आरोग्य तपासणी आदी सर्व सुविधा ग्रामपंचायतीकडून पुरविल्या जातात;त्यामुळे गावच्या हद्दीत राहण्यासाठी नागरिकांची पसंती आहे.ग्रामपंचायत नागरिकांना सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करीत असताना कचरा रस्त्यालगत टाकला जातो.कुणीही कचरा रस्त्याच्या कडेला टाकू नये. कचरा टाकणाऱ्याचे विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.खातेदारांनी घरपट्टी व पाणीपट्टी तात्काळ भरावी.असे आवाहन बाजार समितीचे संचालक व ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य अशोकदादा राक्षे,सरपंच सुरेखा राक्षे व उपसरपंच मच्छिंद्र राक्षे यांनी केले.