राजगुरुनगर शहर ३.४६ कोटींच्या सौर एलईडी पथदिव्यांनी उजळणार; माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मंजूर ३.४६ कोटींच्या प्रकल्पाला सुरुवात; राजगुरुनगर शहरातील प्रमुख रस्ते सौर एलईडी पथदिव्यांनी उजळणार.
महावार्ता लाईव्ह | राजगुरुनगर शहर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना अधिक सुरक्षित, आधुनिक व पर्यावरणपूरक प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ३ कोटी ४६ लाख रुपयांच्या सौर एलईडी पथदिवे प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राजगुरूनगर शहरातील प्रमुख रस्ते सौर प्रकाशाने उजळून निघणार आहेत.
या प्रकल्पाची सुरुवात राजगुरुनगर शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधून करण्यात आली. नगरसेविका स्नेहल राक्षे व नगरसेवक दिनेश सांडभोर आणि सामाजिक कार्यकर्ते विकास चव्हाण यांच्या पुढाकारातून वॉर्डातील विविध भागांमध्ये सौर एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
प्रकल्पांतर्गत शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर पोलसह सौर एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत.त्यामध्ये धनश्री हॉटेल ते एस-मार्ट, नवीन पूल ते पाण्याची टाकी, पाबळ रोड, नवीन पूल ते हुतात्मा राजगुरू वाडा,पंचायत समिती ते तिन्हेवाडी रोड, तिन्हेवाडी रोड (सातनळ ते प्रांत कार्यालय) तसेच पाबळ रोड ते राक्षेवाडी गणपती मंदिर या मार्गांचा समावेश आहे.
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या एलईडी पथदिव्यांमुळे वीज बचत होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पुरेसा प्रकाश उपलब्ध झाल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल व अपघातांना आळा बसेल आणि शहराच्या सौंदर्यात भर पडेल.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून राजगुरुनगर शहरात यापूर्वीही विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत. त्यात आता ३.४६ कोटी रुपयांच्या सौर एलईडी पथदिवे प्रकल्पाची भर पडली असून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.