Shirur Loksabha | शिरूर लोकसभेत दुरंगी नाही ; तिरंगी लढत होणार
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकित घेतला निर्णय
राजगुरुनगर : राजकारण माझा मार्ग नाही आणि मी त्यात येणार नाही. निवडणूक हा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याचा विषयही नाही.त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय ३० तारखेला घेणार आहे.असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकित निर्णय घेतला आहे.
मागील काही दिवसांपासून मराठा समजाच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात दीड हजार अर्ज दाखल करणार असा निर्णय झाला होता.परंतु आता मराठा समाजाकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत होणार नाही हे मात्र निश्चित झाले आहे.त्यामुळे शिरूर मध्ये मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार गट ) विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर राष्ट्रवादी पक्षाकडून ( अजित पवार गट ) माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.परंतु आता मराठा समाजाकडून एक अपक्ष उमेदवार शिरूर लोकसभा मतदार संघाकडून देण्याचा निर्णय झाल्यामुळे या मतदारसंघात दुरंगी नाही तर तिरंगी लढत होईल हे स्पष्ट झाल्याने आता मराठा समाजाकडून उमेदवार देण्याची चाचपणी चालू आहे.शिरूर लोकसभेचे मतदारनिहाय मतदान पाहिले असता मराठा समाजाचे शिरूर मतदार संघात मोठे वर्चस्व आहे. आता याचा फटका कोल्हे व आढळराव यांना बसणार का ? हे येणाऱ्या पुढील काळातच समजेल. शिरूर लोकसभा मतदारसंघात मराठा अपक्ष उमेदवार दिल्यास निर्णयक मतदान मराठा समाजाकडून होणार आहे.
मराठा आरक्षणासाठी मागील काही महिन्यांच्या काळात मराठवाडा परिसरातील जिल्ह्यामध्ये मोठे आंदोलने झाली. त्यानंतर पुणे जिल्ह्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरूनगरला मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जारंगे यांची विराटसभा झाली होती.या सभेला लाखो मराठा बांधवांचा जनसमुदाय जमला होता.तर राजगुरुनगर,चाकण,आळंदी या भागातही जरांगे पाटील यांचा आरक्षणासंदर्भात दौरा दरम्यान सभेला मराठा बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता.
तसेच चाकण,आळंदी,आंबेगाव,जुन्नर,शिरूर,भोसरी,या शहराच्या ठिकाणी मोठी आंदोलने मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली होती.यामधे राजगुरुनगर येथे १२० दिवस साखळी उपोषण तर १० दिवस आमरण उपोषण झाले.चाकण एमआयडीसी बंद असे अनेक आंदोलन छेडण्यात आली.शिरूर लोकसभा मतदारसंघात आंदोलनाच्या रूपाने मराठा समाजाची मोठी ताकद पाहायला मिळाली होती.यामुळे या मतदारसंघात जरांगे यांच्याकडून सकल मराठा समाजाचा उमेदवार उभा राहिल्यास निवडणुकीत मराठा समाजाची निर्णायक भूमिका राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
३० तारखेपर्यंत गावोगावी जाऊन बैठक घेऊन समाजाला आंदोलनाची भूमिका पटवून सांगणार आहोत.प्रत्येक गावचे जनमत विचारात घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाचा आहवाल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देणार आहे. मराठा क्रांती मोर्चा वतीने जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरूर लोकसभेत मराठा आरक्षणात सक्रिय असलेला उमेदवार लोकसभेत पाठवणार आहे.
अंकुश राक्षे - मराठा क्रांती मोर्चा समन्वयक,माजी सभापती
