विशेष विश्लेषण | गहाण पडलेली गुरुदक्षिणा! ‘पाकिटात’ बंदिस्त झालेली मास्तरकी!
'पिंजरा'तील मास्तर कलेच्या मोहात अडकला होता, पण आजचा आधुनिक मास्तर निवडणुकीतील लक्ष्मीदर्शनाच्या जाळ्यात स्वतःहून अडकतोय का?

"पाय घसरलेल्या मास्तराला सोनेरी पिंजरा सोडवत नाही, पण हातात तुणतुणं कधी येतं हेही समजत नाही..." मराठी चित्रपटाच्या आणि लोककलेच्या इतिहासातील या अजरामर वाक्याने एकेकाळी समाजमनाला अंतर्मुख केले होते. तमाशाच्या फडावर आणि नायकिणीच्या सौंदर्यावर भाळलेला ‘पिंजरा’मधील तो आदर्शवादी मास्तर जेव्हा परिस्थितीच्या रेट्याने स्वतःच्या तत्त्वांशी तडजोड करतो, तेव्हा त्याच्या हातात खडूऐवजी तुणतुणं येतं.
पण आज निवडणूक प्रक्रियेच्या नावाखाली जे काही घडताना दिसत आहे, ते पाहिल्यावर चित्रपटसृष्टीतल्या त्या पिंजऱ्यात अडकलेल्या मास्तराची प्रतिष्ठा यापेक्षा कितीतरी पटीने बरी होती, असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. कारण तो मास्तर किमान एका भावनेच्या आणि कलेच्या मोहात अडकला होता; आजचा तथाकथित सुशिक्षित ‘मास्तर’ मात्र अवघ्या पाच-दहा हजार रुपयांच्या पाकिटासाठी स्वतःची अस्मिता आणि शिक्षकी पेशाची अब्रू उघड्यावर लिलावात काढायला निघाला आहे.
सर्वसाधारण निवडणुकांमध्ये मतांच्या बाजाराची एक अलिखित नियमावली असते. झोपडपट्टी परिसर किंवा काही ठराविक वस्त्यांमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री ‘लक्ष्मीदर्शन’ घडवल्याशिवाय मते पडत नाहीत, हा आपल्या लोकशाहीला लागलेला जुनाच रोग आहे. तिथे ‘वाटपाच्या याद्या’ तयार असतात. स्वतःच्या नावाची त्या यादीत वर्णी लागावी म्हणून अनेकांची धडपड असते, तर स्वाभिमानाने जगणारे काही लोक आजही स्वतःला अशा प्रकारे ‘विकून’ घेण्याच्या प्रवृत्तीपासून चार हात लांब राहतात.
पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा अज्ञानापोटी तिथे होणारी मतांची सौदेबाजी एकवेळ समजू शकते; पण समाजाला शहाणं करणाऱ्या, पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांच्या आणि पदवीधरांच्या मतदारसंघात जेव्हा अशाच ‘वाटपाच्या याद्या’ फिरतात, तेव्हा या बौद्धिक दारिद्र्याला काय म्हणावे? अत्यंत खेदाची बाब म्हणजे, आजचा ‘मास्तर’ या झोपडपट्टीतील लाभार्थ्यांपेक्षाही अधिक लाचार आणि ‘गैरगुजरा’ झाला आहे. निवडणुकीच्या रिंगणात पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या यंत्रणा आज छातीठोकपणे ‘आम्ही कोणाला आणि किती सरसकट वाटप केले’ याच्या याद्या वाचून दाखवत आहेत.
शाळानिहाय आणि मुख्याध्यापकनिहाय मतदारांची मोजदाद होऊन कोणी पाच हजारांचे, तर कोणी दहा हजारांचे पाकीट पोहोचवल्याच्या चर्चा आता चहाच्या टपऱ्यांवर रंगू लागल्या आहेत. पन्नास-साठ हजार किंवा लाखाच्या घरात पगार घेणाऱ्या या पांढरपेशा वर्गाला अवघ्या पाच-दहा हजारांच्या चिल्लर रकमेसाठी स्वतःचे मत आणि स्वाभिमान गहाण ठेवताना किंचितही लाज वाटू नये, हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे सर्वात मोठे अपयश आहे.
आपल्या समाजात काही ठराविक खात्यांबद्दल एक सर्वमान्य पूर्वग्रह असतो. पोलीस, महसूल किंवा तलाठी यांसारख्या यंत्रणांमध्ये सगळेच कर्मचारी भ्रष्ट नसतात; किंबहुना अनेक प्रामाणिक अधिकारी तिथेही इमानेइतबारे काम करत असतात. परंतु, सामान्य माणसाची अडवणूक करून, त्याच्या माना मुरगाळून पैसे उकळणे हा या यंत्रणेचा स्थायीभाव बनल्याची भावना जनमानसात घट्ट रुजलेली आहे. त्यामुळे या पदांवरील लोकांकडे बघताना समाज एका विशिष्ट चष्म्यातूनच पाहतो. मात्र, या सगळ्या चिखलातही ‘शिक्षक’ किंवा ‘मास्तर’ हा एकमेव असा घटक होता, ज्याच्याकडे समाज आदराने आणि विश्वासाने पाहत असे.
आज पाच-दहा हजारांच्या पाकिटाच्या मोहापायी शिक्षकांनी स्वतःहून स्वतःची रवानगी त्या ‘भ्रष्ट आणि विकल्या जाणाऱ्या’ जमातीच्या रांगेत करून घेतली आहे. ज्या हातांनी विद्यार्थ्यांना नीतिमत्तेचे आणि प्रामाणिकपणाचे धडे द्यायचे, त्याच हातांनी अंधारात राजकीय पक्षांची पाकीटं मोजली जात असतील, तर उद्याच्या भारतात कोणते नागरिक घडणार आहेत?
पाच-दहा हजारांच्या नोटा दोन दिवसांत खर्च होऊन जातील; पण त्यामुळे शिक्षकी पेशाला लागलेला हा विकाऊपणाचा डाग पुसला जाणारा नाही. सोनेरी पिंजऱ्यात अडकलेल्या या आधुनिक मास्तरांच्या हातात केव्हाच राजकीय व्यवस्थांचे ‘तुणतुणे’ आले आहे. फरक इतकाच की, पूर्वीच्या मास्तराला आपल्या अधःपतनाची जाणीव तरी होती; आजचा मास्तर मात्र पाकिटातली रक्कम मोजण्यात इतका मग्न आहे की, आपली आणि आपल्या पेशाची रया केव्हाच धुळीस मिळाली आहे, याचे भानही त्याला उरलेले नाही!