Khed Police Marathon | खेड पोलिसांच्या वतीने ५ किमी 'एकता दौड'चे आयोजन; विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद
पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचाही दौडमध्ये प्रत्यक्ष सहभाग; उपस्थितांनी घेतली राष्ट्रीय एकतेची शपथ
महावार्ता लाईव्ह | भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त तसेच 'राष्ट्रीय एकता दिवसा'चे औचित्य साधून खेड पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य 'एकता दौड' (मॅरेथॉन स्पर्धा) आयोजित करण्यात आली होती. समाजात राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता आणि बंधुभावाचा संदेश पोहोचवण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाला पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
५ किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजगुरूनगर येथील पाबळ चौक येथून दौडला सुरुवात झाली. पुढे धनश्री चौक, पाण्याची टाकी चौक आणि तिन्हेवाडी चौक या मार्गावरून जात तिन्हेवाडी येथील क्रीडा संकुल मैदानावर या एकता दौडचा समारोप करण्यात आला.

या उपक्रमात खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्यासह २ पोलीस अधिकारी आणि २० पोलीस अंमलदार यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांच्यासोबतच शहरातील 'गगन भरारी अकॅडमी', 'जे राम फिटनेस अकॅडमी', 'गव्हाणे अकॅडमी' आणि 'ज्ञानदीप अकॅडमी' या करिअर अकॅडमींमधील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने धावत राष्ट्रीय एकतेचा जागर केला.

तिन्हेवाडी क्रीडा संकुल येथे स्पर्धेचा समारोप झाल्यानंतर, मॅरेथॉनमध्ये प्रथम व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करून बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. खेड पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाला पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरला.