Khed zp election | जीवन खराबींचा विजय ! नाणेकरवाडी गटात उमेदवारी वैध ; आक्षेप फेटाळला
गायरान अतिक्रमण, मालमत्ता लपवल्याचा आक्षेप फेटाळला; खराबींच्या समर्थकांचा फटाक्यांचा जल्लोष
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील २७ - नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार जीवन खराबी यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश बोत्रे यांचे सुचक मंगेश सातव यांनी खराबी यांच्या नामनिर्देशनपत्रात जोडलेल्या शपथपत्र अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांच्याकडे आक्षेप घेण्यात आला.
गणेश बोत्रे यांच्या सूचक सातव यांनी खराबी यांच्या
शपथ पत्रात प्रॉपर्टी दाखवण्यात आली नाही व गायरान मध्ये अतिक्रमण केले असे आक्षेप घेण्यात आला होता. या आक्षेपांमुळे खराबी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी या आक्षेपांची सुनावणी घेतल्यानंतर आज हा आक्षेप पूर्णपणे फेटाळून लावला. त्यांनी जीवन खराबी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आणि त्यांना निवडणूक लढविण्यास मुभा दिली.
अर्ज वैध ठरताच खराबी यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला. परिसरात फटाके फोडण्यात आले आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना (उबाठा) कार्यकर्ते आणि स्थानिक समर्थकांनी हा निर्णय आपल्या बाजूने मोठा विजय मानला आहे. नाणेकरवाडी गटात येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील ही लढत आता अधिक रंगतदार होणार असून, दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरू होण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रक्रिया आता अधिक रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे.
