खेड तालुक्यातील २७ गावांच्या पोलीस पाटील पदाच्या परीक्षेला स्थगिती
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील तालुक्यातील २७ गावांची पोलिस पाटील रिक्त पदाची भरतीबाबतची मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलली आहे. लेखी परीक्षेची सुधारित वेळ व ठिकाणाची माहिती सर्व उमेदवारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, अशी माहिती खेडचे प्रांतअधिकारी जोगेंद्र काट्यारे यांनी दिली.
खेड तालुक्यातील रिक्त पदाचे पोलिस पाटील भरतीबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. सदर कार्यक्रमानुसार इच्छुक उमेदवार यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यानुसार सोमवारी (ता. २४) पात्र/अपात्र उमेदवारांची यादीही प्रसिद्ध केली आहे.
पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. व खेड तालुक्यातील काही गावांमधील पुणे रिंगरोड संपादित जमिनीची मोजणीची तारीख निश्चित केली आहे. त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच रोहकल येथील एमआयडीसी जमीन संपदानाबाबत मोजणीची कारवाई व इतर प्रशासकीय कामकाज यांचे नियोजनाचे अनुषंगाने पोलिस पाटील पदासाठीची लेखी परीक्षा पुढे ढकलली आहे.
