Pune leopard | कोयाळी शिवारात बिबट्या जेरबंद

परिसरातील नागरिक, शेतकऱ्यांना दिलासा

Pune leopard | कोयाळी शिवारात बिबट्या जेरबंद

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील कोयाळी  गावच्या हद्दीत (चाकण वनपरिक्षेत्र) फिरत असलेल्या बिबट्याला वन विभागाने ग्रामस्थांच्या सक्रिय सहकार्याने सुरक्षितरीत्या जेरबंद केले आहे. या बिबट्याने सुदाम वाघोले यांच्या कालवडीवर हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

या घटनेनंतर वन विभागाने तत्काळ कारवाई करत १० डिसेंबर रोजी दत्तात्रय काळुराम भाडळे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३९ मधील शेतात पिंजरा लावला. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे आणि चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आलेल्या या पिंजऱ्यात पहाटेच्या सुमारास सुमारे सात वर्षांचा नर बिबट्या अडकला.

 

घटनेची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यू व्हॅन तसेच वनपाल आनंदकुमार इंदलकर, वनरक्षक नवनाथ पगडे, धनराज तोंडे, अजय कोळेकर आणि अक्षय काळे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्र, जुन्नर येथे सुरक्षितपणे हलविण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. सरपंच विकास भिवरे यांनी ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुढील काही दिवस परिसरात सतर्कता ठेवण्याचे आवाहन केले.