Khalumbre Professor Atul Pawar Achieves PhD | खालुंब्रेचे सुपुत्र प्रा.अतुल पवार यांना कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग मध्ये पीएच.डी पदवी
संशोधन क्षेत्राच्या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रा. अतुल पवार यांचे संशोधनाचे सादरीकरण
महावार्ता लाईव्ह | खालुंब्रे गावचे सुपुत्र प्रा. अतुल पवार यांनी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयात पीएच.डी. पदवी संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे खालुंब्रे गावासह संपूर्ण खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. अतुल पवार हे खालुंब्रे गावचे माजी सरपंच गुलाबराव पवार यांचे सुपुत्र, तर खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोलदादा पवार यांचे लहान बंधू आहेत. त्यांनी पीएच.डी.च्या संशोधन प्रवासातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या संशोधनाचे दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण व प्रकाशन झाले असून, एका आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकामध्ये त्यांचा संशोधन लेख प्रकाशित झाला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या संशोधनातून एका पेटंटचीही नोंद झाली आहे. ही कामगिरी त्यांच्या संशोधनातील सातत्य, जिद्द आणि मेहनतीची साक्ष देणारी आहे.
प्रा. अतुल पवार हे गेल्या १६ वर्षांपासून निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (PCCOE) संगणक विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या संपूर्ण संशोधन प्रवासात त्यांना पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. नरेंद्र कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संगणक विभागप्रमुख डॉ. सोनाली डी. पाटील, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. के. राजेश्वरी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, PCET ट्रस्टचे पदाधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.
आपल्या यशामागे कुटुंबीयांचा मोठा वाटा असल्याचे सांगत, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळेच पीएच.डी.चे स्वप्न साकार करता आले, अशी भावना प्रा. अतुल पवार यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातून पुढे येत उच्च शिक्षण, संशोधन आणि अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रा. अतुल पवार यांच्या यशाचे खेड तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे तरुणांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.