Chakan crime | पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: ११.६५ लाखांचा एम.डी. पदार्थ जप्त, तिघांना अटक

दक्षिण महाळुंगे पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणाहून विक्रीसाठी नेल्या जाणाऱ्या अंमली पदार्थासह आरोपी ताब्यात

Chakan crime | पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: ११.६५ लाखांचा एम.डी. पदार्थ जप्त, तिघांना अटक

 

महावार्ता लाईव्ह | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एन.डी.पी.एस.) मोठी यशस्वी कारवाई करत सुमारे ११ लाख ६५ हजार रुपये किमतीचा ‘एम. डी.’ (मॅफेड्रॉन) हा अवैध अंमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, आणखी दोन संशयित फरार आहेत.

 

ही कारवाई बुधवार ( २२ एप्रिल ) रात्री सुमारे ९ वाजता दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील खालुम्ब्रे गाव ते जोपादेवी मंदिराकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर, भानुदास माडे यांच्या इमारतीसमोर सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली.


पोलिस हवालदार विजय दौंडकर (अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शिशुपाल धनाराम चौधरी (वय २५, मूळ रा. पोटलिया, राजस्थान) व रामदिन भवरलाल चौधरी (वय २४, मूळ रा. रामआसनी, भिलाडा, जोधपुर, राजस्थान) यांच्याकडे तपासणी केली असता त्यांच्याकडे सुमारे ११६ ग्रॅम ५४ मिलिग्रॅम वजनाचा एम. डी. हा अंमली पदार्थ आढळून आला. हा पदार्थ त्यांनी अवैधरित्या विक्रीसाठी वाहतुक केली होती.

 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत शिशुपाल व रामदिन यांनी हा अंमली पदार्थ प्रविण मल्लाराम चौधरी (वय २२, सध्या रा.वडगाव मावळ, ता. मावळ, जि. पुणे, मूळ रा. हुंडो का बास, हरीवादा, मिलाडा, जोधपुर) यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. तसेच हा पदार्थ फरार असलेल्या मांगीलाल चौधरी व नरेश चौधरी यांच्यासह इतर मोबाईल क्रमांकधारकांना विक्रीसाठी नेल्याचे सांगितले.

 

पोलिसांनी या कारवाईत दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण साडेतेरा लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त मुद्देमालात अंमली पदार्थासह १ मोटारसायकल, ३ मोबाईल, १ इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, प्लास्टिक पाउच व स्टीलचा चमचा यांचा समावेश आहे. जप्त मालाची एकूण किंमत १३ लाख ८६ हजार रुपये (सुमारे) इतकी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

 

या प्रकरणी एन.डी.पी.एस. कलम ८(क), २२(क) व २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.